‘नेरले तलाव भरण्यात यावा’ या मागणीसाठी आळसुंदे येथे ग्रामस्थांनी केले रास्ता रोको आंदोलन

करमाळा (दि.२४) – काल (दि.२३ ऑगस्ट) करमाळा तालुक्यातील आळसुंदे येथे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी टेल टू हेड या शासकीय धोरणानुसार सोडावे व नेरले तलाव हा दहिगाव उपसा सिंचन या योजनेतून भरावा यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आळसुंदे फाट्या वरील रस्ता अडवून हे आंदोलन करण्यात आले. कुकडी प्रकल्पाचे अधिकारी यांनी लेखी पत्र देऊन व करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मध्यस्थी करून हे आंदोलन तूर्त स्थगित केले.
आंदोलनाची सुरुवात होत असताना अनेक शेतकरी कार्यकर्त्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. उजनी धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी दहीगाव उपसा सिंचन योजनेतून सोडून नेरले तलाव भरून घ्यावा व या योजनेचे पाणी टेल टू हेड या शासकीय धोरणानुसार तात्काळ सोडावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

दहिगाव उपसा सिंचन योजने अंतर्गत २९ गावांना शेती साठी सिंचन प्रकल्प आहे.परंतु या योजनेच्या प्रारंभिक मंजुरीस २८ वर्षे पूर्ण होत आहेत .ही योजना लोकनेते स्व.दिगंबरराव बागल यांनी मंत्री पद नको पण हि योजना मंजूर करा अशी मागणी केली होती त्यावरून हि योजना स्व.दिगंबरराव बागल मामा यांच्या कार्यकाळात १९९६ साली मंजूर झाली असून आज तागायत ही योजना पूर्णत्वास आलेली नाही. मूळ मंजुरीमध्ये आळसुंदे गाव लाभक्षेत्रात आहे परंतु असे असताना देखील संबंधित योजनेच्या लाभाचा हिस्सा कधीही आळसुंदे गावास मिळाला नाही. यामुळे आळसुंदे ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी मकाई सहकारी साखर कारखाना संचालक व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ, राणा वाघमारे, औदुंबरराजे पाटील, सरपंच संजय धारेकर यांनी संबंधित अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. टेल टू हेड या शासकीय धोरणानुसार पाणी का सोडले जात नाही याचा जाब विचारला. व या योजनेतील इतर हि गावे आहेत त्यांच्यात व आमच्या मध्ये भांडण लावू नका असे सांगितले व उजनीतील अतिरिक्त पाणी सोलापूर कर्नाटकला सोडण्यापेक्षा ज्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्याच तालुक्यातील लोकांना मिळावे आणि ओव्हर फ्लो च्या पाण्याने तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व पाझर तलाव तसेच नेरले तलाव भरून घ्यावा अशी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी कुकडी डावा कालवा यांच्याकडे मागणीचे पत्र दिले.

त्यावर कुकडी प्रकल्पाचे अधिकारी यांनी लेखी पत्र देऊन व करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मध्यस्थी करून हे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. परंतु अधिकाऱ्यांनी लेखी दिलेला शब्द पाळला नाही तर मुख्य अभियंता,कृष्णा खोरे विकास महामंडळ सिंचन भवन पुणे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशाराही आंदोलन कर्त्यांनी यावेळी दिला.

यावेळी आंदोलनास आळसुंदेचे गावचे सरपंच संजय धारेकर ,माजी सरपंच सोमनाथ देवकते, उपसरपंच बाजीराव घाडगे, अंगद पाटील, गोविंद पाटील, गोपाळ येवले, तानाजी घाडगे,शहाजी घाडगे , ज्योतिराम घाडगे,गणेश देवकते,जयसिंग घाडगे,परम मोरे,,सतीश रूपणर,तानाजी लोकरे सर, बालाजी घाडगे ,जयसिंग पाटील,कुमार पाटील, गणेश देवकते, राजेंद्र देवकते, अनिकेत घाडगे, अक्षय घाडगे, विजय देवकते, आबा देवकते, सौरभ धारेकर, शुभम धारेकर, गणेश कोळी, नवनाथ सरवदे, संभाजी सरवदे, धनाजी सरवदे, श्रीकांत येवले, राघू दादा घाडगे, तात्या सरडे,शहाजी देवकते,धर्मेंद्र येवले आणि अनेक आळसुंदे सालसे, वरकुटे,व परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

