जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा व बहुजन समाजाच्यावतीने उद्या ‘करमाळा शहर व तालुका बंद’चे आवाहन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असून, उपोषणाचा आज (ता.२१) पाचवा दिवस आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, तरीसुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी सकल मराठा समाज व बहुजन समाज करमाळा यांच्यावतीने उद्या (ता.२२) ‘करमाळा शहर व तालुका बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. हे लक्षात घेऊन सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात. जरांगे-पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज व बहुजन समाज करमाळाच्या वतीने उद्या रविवारी करमाळा शहर व तालुका बंदचे आवाहन करण्यात करण्यात आले असून, जरांगे-पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, असे सकल मराठा समाज व बहुजन समाज करमाळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज व बहुजन समाज बांधवांनी उद्या सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येण्याचे आवाहन सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा शहर व तालुका यांनी केले आहे.