भावा-भावांमध्ये शेतातील खोल्या दुरुस्तीवरून हाणामारी..

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.26 : केम गावात शेतातील खोल्या दुरुस्तीवरून दोन भावांमध्ये वाद होवून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत उतरेश्वर जगन्नाथ देवकर यांनी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी ते शेतातील पत्र्याच्या खोल्यांची दुरुस्तीचे काम करत असताना त्यांचे मोठे भाऊ सुरेश जगन्नाथ देवकर, त्यांचा मुलगा तुषार, पत्नी वैशाली तसेच संकेत सावता कुर्डे हे तिथे आले.

त्यानंतर सुरेश यांनी उत्तरेश्वर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावर न थांबता त्यांनी जवळच पडलेली विट उचलून त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीला वाचविण्यास गेलेल्या विजय उतरेश्वर देवकर व ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ देवकर यांना तुषार व संकेत यांनी काठ्यांनी मारहाण केली. तर सुरेश यांची पत्नी वैशाली हिने फिर्यादीची पत्नी सारीका हिला हाताने मारहाण केली. डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने फिर्यादीस रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत फिर्यादी आपल्या कुटुंबीयांसह करमाळा पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.



