केम येथे थोरल्या वाड्याच्या मानाच्या कावडीचा छबीना उत्साहात पार पडला

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम गावामधून अंकोली (ता.मोहोळ जि. सोलापूर) यात्रेसाठी निघणाऱ्या थोरल्या वाड्याच्या मानाच्या कावडीचा छबीना मोठ्या उत्साहात पार पडला.
केम गावात अंकोली भैरवनाथाच्या दोन कावडी प्रसिद्ध आहेत — एक थोरल्या वाड्याची मानाची कावड आणि दुसरी पाटलांची कावड. या दोन्ही कावडी पौर्णिमेला श्री उत्तरेश्वर मंदिरातील बारवेत भरल्या जातात. त्यानंतर श्री उत्तरेश्वर बाबांना धार अर्पण केली जाते आणि मग या कावडी गावातून मिरवून थोरल्या वाड्याजवळील पायरीवर उभ्या केल्या जातात. यात्रेपर्यंत ही कावड तेथेच ठेवली जाते.

अंकोली यात्रेसाठी केमहून पायी ११० किमीचा प्रवास करून ही कावड दोन मुक्कामांसह अंकोली येथे पोहोचते. अंकोली येथे तीन दिवस कावडीचा मुक्काम असतो. या ठिकाणी या कावडीला मान असल्याने तिला “मानाची कावड” म्हणून ओळखले जाते.
यात्रेनंतर ही कावड पुन्हा केमला आणली जाते. गावात परतल्यानंतर मारुती मंदिराजवळ कावड उभी केली जाते आणि सायंकाळी सात वाजता कावडीचा छबीना काढला जातो. यंदा छबीन्यासाठी करमाळा येथील दोन बॅण्ड्स आणि केम येथील श्री उत्तरेश्वर हलगी पथक सहभागी झाले होते. हलगीच्या तालावर भैरवनाथ भक्तांनी गुलालाची उधळण करत जल्लोषात नृत्य केले.

कावडीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कावड भैरवनाथ मंदिराजवळ आल्यानंतर ती टेकवून देवाच्या गजरात “भैरवनाथाचा चांगभल!” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.

ही भव्य मिरवणूक तब्बल पाच तास चालली. शेवटी पायरीजवळ भैरवनाथाची आरती करून छबीन्याची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या संपूर्ण मिरवणुकीसाठी भैरवनाथ भक्तांनी अपार मेहनत घेतली.




