एमपीएससी परीक्षेत सालसे येथील अमित लोकरे यांचा राज्यात पाचवा क्रमांक – उपजिल्हाधिकारी पदावर निवड

करमाळा(दि. २):करमाळा तालुक्यातील सालसे येथील अमित लोकरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे.

अमित हे सालसे येथील नारायण लोकरे यांचे नातू आणि कै. गोकुळ लोकरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी आपले शिक्षण बार्शी येथील सुलाखे हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) या विषयात अभियांत्रिकी शिक्षण घेतले. अभियांत्रिकी पूर्ण झाल्यानंतर त्यांना विप्रोसारख्या नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. मात्र, स्पर्धा परीक्षांमधून प्रशासन सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. दोन वेळा अल्प फरकाने अपयश आले तरी त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर राज्यात पाचवा क्रमांक मिळवत यशाचे शिखर गाठले.

अमित यांच्या या यशाबद्दल सालसे गावात सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या घरी झालेल्या सत्कार समारंभात दत्तात्रेय घाडगे, केशव सालगुडे, मुळीक साहेब, प्रा. धनंजय पन्हाळकर, हांडे सर, ओहोळ सर तसेच त्यांचे वर्गमित्र उपस्थित होते.


मी शेतकरी कुटुंबातील असलो तरी शिक्षण घेताना घरच्यांनी कधीही कशाचीही कमतरता पडू दिली नाही. वडिलांचे छत्र हरवले असतानाही आजोबांनी मोठ्या जबाबदारीने माझ्या शिक्षणाला साथ दिली. माझे मामा व क्लास-वन अधिकारी मुळीक साहेब यांनी योग्य मार्गदर्शन केले. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि संयम या गुणांमुळे ग्रामीण भागातील तरुणांनाही यश मिळवता येते. – अमित लोकरे



