‘भारत डाळ’ योजनेचे खासदार नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करमाळ्यात उद्घाटन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – १६ ऑक्टोबर रोजी करमाळा येथे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ‘भारत डाळ’ योजनेचा शुभारंभ झाला आहे. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील व जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी भाजपा कार्यालय करमाळा येथे आयोजित करण्यात आले होते.
‘भारत डाळ’ योजनेतर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ६०/- रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो हरभरा दाळ मिळणार आहे. सर्वसामान्यांना ही दाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळख पत्रावर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ, फक्त ६० रु प्रतिकिलो दराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. दाळ खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचे असून एका कुटुंबात पाच सदस्य असतील तर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ खरेदी करता येणार आहे.
या भारत डाळ वाटप कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहावर कार्यकर्ता संवाद बैठक घेण्यात आली होती. यावेळी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या समोर तालुक्यातील विविध लोकांनी रस्ते, शेतीसाठी पाणी, रेल्वे, वीज, सभामंडप आदी प्रश्न मांडले. याचबरोबर पांडे, झरे, देवळाली येथील शेतकऱ्यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचा लाभ देण्याची विनंती केली.