दत्तकला महाविद्यालयात रेडिओ स्टेशनचे उद्घाटन

केम(संजय जाधव): शैक्षणिक प्रसार, कृषी संवाद, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि माहिती प्रचाराच्या दिशेने मोठे पाऊल उचलत दत्तकला इंजिनिअरिंग महाविद्यालयाने दत्तकला रेडिओ या नव्या रेडिओ स्टेशनचे उद्घाटन थाटामाटात केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव सौ. माया झोळ, सीईओ डॉ. विशाल बाबर, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील आणि डॉ. उषादेवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रा. रामदास झोळ यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या या रेडिओ स्टेशनचे प्रक्षेपण इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आले असून हे केंद्र २४ तास कार्यरत राहणार आहे. त्यामुळे जगभरातील श्रोते याचा लाभ घेऊ शकणार आहेत. या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. प्रमोद पाटील यांनी तंत्रज्ञानाच्या उपयोगातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचे मत व्यक्त केले.


दत्तकला रेडिओवर शैक्षणिक विषयांबरोबरच कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, सरकारी योजनांची माहिती, आरोग्य मार्गदर्शन, हवामान अंदाज, पर्यावरण जनजागृती, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती प्रसारित करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष प्रा. झोळ यांनी व्यक्त केला आहे.

सचिव सौ. माया झोळ यांनी या उपक्रमात महिलांच्या सबलीकरणावर भर देत स्थानिक महिलांना उद्योगधंद्यांची माहिती मिळावी यासाठी रेडिओचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या प्रकल्पातून परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी असेही सांगितले.

या केंद्राच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अकॅडमिक डीन प्रा. शीतल धायगुडे, IQAC समन्वयक प्रा. पल्लवी सूळ आणि संगणक विभागप्रमुख डॉ. सचिन बेरे यांचे विशेष योगदान असून सचिव सौ. माया झोळ यांनी रेडिओच्या भविष्यकालीन विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुरू झालेले हे पहिलेच रेडिओ केंद्र असून या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत आणि कौतुक होत आहे.

DATTAKALA RADIO हे गुगल वर सर्च करा आणि ऐका या रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून शैक्षणिक माहिती तसेच छान छान गाणी आपल्याला ऐकायला मिळतील.
लिंक –
https://www.dattakala.edu.in/radio.html● माया झोळ, सचिव, दत्तकला शिक्षण संस्था

