महिलांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास सवलतीमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ – करमाळा आगारप्रमुख वीरेंद्र होणराव

करमाळा (सुरज हिरडे) – १७ मार्च २०२३ पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना ‘महिला सन्मान योजनेच्या’ अंतर्गत एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जात आहे. तसेच ७५ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक या योजनेअंतर्गत एसटीचा प्रवास मोफत केला आहे. या योजनांचा लाभ महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने घेत असून याचा उपयोग एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी झालेला असल्याची माहिती करमाळा बसस्थानक आगारप्रमुख वीरेंद्र होणराव यांनी दिली.

एप्रिल २०२३ महिन्यात करमाळा आगार मधून एक लाख चारशे एकोणतीस (१,००,४२९) ज्येष्ठ नागरीकांनी एसटी मधून मोफत प्रवास केला. यामधून करमाळा आगाराला ५१ लाख ३१ हजार १४८ रुपये उत्पन्न मिळाले. तर एप्रिल २०२३ महिन्यात १ लाख ४५ हजार १६८ महिलांनी करमाळा आगाराच्या एस्टीतून प्रवास केला. यातून ४९ लाख २७ हजार १३१ रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती व्यवस्थापक अरुण घोलप यांनी दिली. या योजनांमुळे खाजगी वाहतूकी कडून एसटीत प्रवास करण्याचा महिला व ज्येष्ठ नागरिकांचा टक्केवारी वाढली आहे. याचा एसटीच्या आर्थिक सुधारणा होण्यासाठी नक्कीच फायदा होत आहे.

अमृत ज्येष्ठ नागरिक ही योजना २६ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली. याद्वारे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत झाला. याआधी ६५ वर्षां वरील नागरिकांना एसटी प्रवासात ५०% सवलत होती. ती आता ६५ ते ७५ या वयोगटातील व्यक्तिंना चालू आहे. आता सर्व महिलांना प्रवासात ५०% सवलत आहे. या शिवाय विद्यार्थिनींना मोफत पास, शालेय खेळाडूंना प्रवासात सवलत आहे. अशा अनेक सवलती आहेत, ही संस्था लोकांसाठी असून याचा नागरीकांकडून पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख वीरेंद्र होणराव यांनी केले. या सर्व सवलत एसटी महामंडळ कडून नागरिकांना दिल्या जात असल्या तरी याची भरपाई महाराष्ट्र शासनाकडून एसटी महामंडळाला दिली जात आहे. यामुळे एसटी महामंडळाला या सवलतींचा तोटा नसून फायदाच होत आहे.

अपुऱ्या बसेस व कर्मचाऱ्यांची कमतरता

वीरेंद्र होनराव यांनी एक महिन्यापूर्वी करमाळा बस स्थानकात आगार प्रमुख म्हणून चार्ज घेतलेला आहे. यावेळी त्यांच्या कडून त्यांच्या समोरील प्रमुख आव्हानांपैकी विषयी बातचीत करताना ते म्हणाले की जून महिन्यामध्ये शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेक गावातून बस सुरू करण्याची मागणी झाली तर आमच्याकडे बसेसची संख्या पुरेशी नाही. सध्या देखील १५ ते २० बसेस कमी पडत आहेत. आषाढी वारी साठी मोठ्या प्रमाणात बसेस लागतात. याचबरोबर एसटी महामंडळा कडून कर्मचाऱ्यांची नवीन भरती न झाल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. याविषयी आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून हा प्रश्न सोडविणार आहोत.

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानासाठी नागरिकांनी दयावे योगदान

१ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या दरम्यान ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ हे अभियान महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात आलेले असून यात सहभागी बसस्थानकाना राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरावर विजेत्या बसस्थानकांना अडीच कोटींची बक्षीसे देण्यात येणार आहेत. या योजनेत करमाळा बसस्थानकान भाग घेत आहे. बक्षिसे मिळविण्याच्या हेतूने नाही तर या निमित्ताने बसस्थानक स्वच्छ व सुंदर होईल याकडे आम्ही सर्व जण लक्ष देणार आहोत. याचबरोबर नागरिकांनीही यात योगदान देऊन सहकार्य करण्याची अपेक्षा श्री होणराव यांनी यावेळी व्यक्त केली. प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बसस्थानक कसे स्वच्छ राहील याकडे लक्ष द्यावे. याचप्रमाणे सामाजिक कार्य करणारे व्यक्ती, संस्था, समूह हे आपले योगदान देऊन सहकार्य करू शकता. त्यांनी केलेल्या मदतीला सौजन्य म्हणून त्यांचे त्या त्या ठिकाणी नाव देऊ.

राज्यस्तरावरील विजेत्यांना बक्षिसे पुढील प्रमाणे

  • अ वर्ग प्रथम क्रमांकास ५० लाख रुपये, चषक व प्रशस्तीपत्र,
  • ब वर्ग प्रथम क्रमांकास २५ लाख रुपये चषक व प्रशस्तीपत्र
  • क वर्ग प्रथम क्रमांकास १० लाख रुपये चषक व प्रशस्तीपत्र अशी बक्षीसे आहेत.

प्रादेशिक स्तरावरील बक्षिसे –

अ वर्ग बसस्थानकास

  • प्रथम क्रमांक रु १० लाख रुपये, चषक व प्रशस्तीपत्र,
  • द्वितीय ५ लाख रुपये व प्रशस्तीपत्र,
  • तृतीय २.५० लाख व प्रशस्तीपत्र

  • ब वर्ग बसस्थानकास
  • प्रथम क्रमांक रूपये ५ लाख, चषक व प्रशस्तीपत्र,
  • द्वितीय २.५० लाख व प्रशस्तीपत्र,
  • तृतीय १.५० लाख व प्रशस्तीपत्र,

क वर्ग बसस्थानक

  • प्रथम १ लाख चषक व प्रशस्तीपत्र,
  • द्वितीय ५० हजार व प्रशस्तीपत्र,
  • तृतीय २५ हजार व प्रशस्तीपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!