राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांमध्ये समाजभानाची रुजवण – वडशिवणेत उत्तरेश्वर कॉलेजचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न

करमाळा(संदेश प्रतिनिधी) : श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज, केम यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर वडशिवणे गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते झाले, तर समारोप कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष गोविंद जगदाळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर स्वच्छतेचा संदेश देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व पुढे विविध ठिकाणी श्रमदान करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमदानाचे संस्कार रुजविले जातात, असे सांगितले. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे गोविंद जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वृक्षारोपणासारख्या विधायक उपक्रमांतून पर्यावरण संतुलन साधले जाते, असे नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गोरख काका पारखे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी प्रेरणा दिली.या विशेष श्रमसंस्कार शिबिरांतर्गत प्रभात फेरी, श्रमदान, क्षेत्रीय भेटी, स्मशानभूमी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर तसेच विविध विषयांवरील उद्बोधक व्याख्याने आयोजित करण्यात आली.शिबिरादरम्यान रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या वतीने प्लास्टिकमुक्त कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकमुक्ती अभियानाचे संदेश देणारे बॅनर उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

राष्ट्रीय सेवा योजनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक लक्ष्मणराव राख यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. या कार्यक्रमास प्राचार्य माधव बेले, सरपंच विशाल जगदाळे, उपसरपंच अमोल उघडे, गोरख आप्पा जगदाळे, दत्तात्रय साळुंखे, गणेश जगदाळे, कुबेर कोडलिंगे, रत्नाकर कदम, मुकुंद वाघमारे, रेवन टकले, गणेश कवडे, लक्ष्मण मोरे, संतोष कवडे, ऋषिकेश जगदाळे, सुशील कोडलिंगे, सोमनाथ टकले, बाबू उघडे, तेजस पाटील, गणेश गिरी, मुख्याध्यापक भीमराव भोसले, मुख्याध्यापक हरिदास मोळीक, ग्रामसेविका माने, वसंत तळेकर, सचिन रणशृंगारे तसेच वडशिवणे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

