कुगावमध्ये पहिलीतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप – सरपंच सुवर्णा पोरे यांची माहिती

करमाळा (दि.१२) : कुगाव ग्रामपंचायतीत नुकत्याच झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत सरपंच सौ. सुवर्णा महादेव पोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती साहित्य पोहोचविण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे.

या बैठकीस उपसरपंच विजया गावडे, सदस्य मन्सूर सय्यद, कोमल अवघडे, अमृता कोकरे, सखुबाई अवघडे, मंगेश बोंद्रे, कौशल्या कामटे, प्रकाश डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत बारकुंड व कर्मचारी महादेव बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या निर्णयाविषयी बोलताना सरपंच पोरे म्हणाल्या, “गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यातील पिढी सक्षम होण्यासाठी शिक्षण हे पहिले पाऊल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आम्ही या उपक्रमाची सुरुवात करत आहोत.”

या उपक्रमाला आमदार नारायण पाटील, आदिनाथ सहकारी कारखान्याचे संचालक महादेव पोरे आदींचे मार्गदर्शन लाभणार असून, ग्रामस्थांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.


