उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची रावगाव शाळेला प्रेरणादायी भेट

करमाळा(दि.२१) रावगाव (ता. करमाळा) येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले आणि सध्या उपजिल्हाधिकारी पदावर उदगीर येथे कार्यरत असलेले श्री. सुशांत शिंदे तसेच मुंबईत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत श्री. प्रवीण बुधवंत यांनी अलीकडेच आपल्या मातृशाळेला सदिच्छा भेट दिली. या भेटीने संपूर्ण शाळेत आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. “शिस्त, मेहनत आणि सातत्य हेच यशाचे गमक आहे,” असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “या शाळेने आमच्या आयुष्याची घडी बसवली आहे,” असे भावनिक उद्गार काढत त्यांनी शिक्षकांचे विशेष आभार मानले.

मुख्याध्यापक श्री. विजय कोळेकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. “आमच्या शाळेचे विद्यार्थी आज समाजात उच्च पदांवर आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी “क्रांतिसूर्य महात्मा फुले समता पुरस्कार” प्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री. भास्कर भाऊ पवार यांच्यासह श्री. प्रशांत शिंदे, श्री. बापूसाहेब कांबळे, मेजर शहाजी ओव्हाळ आणि श्री. सचिन जौंजाळ यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या भेटीदरम्यान शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या भेटीने विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातूनही मोठ्या संधी मिळू शकतात याची प्रेरणा मिळाली. ही भेट शाळेच्या इतिहासात एक प्रेरणादायी पान ठरली आहे.



