करमाळा-निंभोरे-दहिवली-वेनेगाव दरम्यान पालखी मार्ग घोषित करावा – वारकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी

केम (संजय जाधव) – आषाढी वारीसाठी पंढरपूरला, जाणाऱ्या दिंडयासाठी करमाळा-गुळसडी-सरपडोह- वरकटणे-निंभोरे-वडशिवणे-सातोली-दहिवली-कन्हेरगाव- वेणेगाव (हायवे) हा परंपरागत जुना पालखी मार्ग घोषित करावा अशी वारकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी असून ती अद्याप प्रलंबित आहे.

२०२१ मध्ये आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी वाहतूक आणि रस्ते मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सदर मार्गासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी निवेदनाद्वारे केली होती परंतु निधीची तरतूद झाली नसल्याने रस्त्याची स्थिती काही सुधारली नाही.

आषाढी वारीसाठी मराठवाडा, खानदेश, विदर्भातून करमाळा, गुळसडी, वरकटणे, निंभोरे, वडशिवणे, सातोली, दहिवली, कन्हेरगाव,वेणेगाव (हायवे) या मार्गे सुमारे २५० ते ३०० दिंडया जात असतात ज्यात सुमारे दोन लाख वारकरी असतात. या मार्गावरील सर्व गावांमध्ये ग्रामस्थांच्या वतीने राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते.  या सर्व स़ोयी वारकऱ्यांना मिळाल्या तरी रस्त्याची समस्या मात्र वारकऱ्यांच्या पाचवीला पुजली आहे.  सातोली ते दहिवली या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.  रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. बऱ्याच ठिकाणी मार्गावर कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावरून चालताना वारकऱ्यांच्या पायाला वेदना होतात,पाय मुरगळतात वारकऱ्यांचे गुडगे, दुखतात पण वारकरी याही परिस्थितीत पांडुरंगाचे नाम घेत पंढरपुरकडे वाटचाल चालू ठेवतात. पुढच्या वारीला येताना तरी हा रस्ता चांगला असावा अशी अपेक्षा वारकरी ठेवून असतात. त्यामुळे शासनाने ह्या रस्त्याला पालखी मार्ग घोषित करून रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी वारकऱ्यांची आहे.

या पालखी मार्गावर निंभोरे हे गाव आहे. या गावात थ़ोर संत शांतामाई यांची समाधी आहे. या संत शांतामाई अंध असूनहि संपूर्ण ज्ञानेश्वरी, हरिपाठ पाठ होते त्या संत म्हणून मराठवाडा, खानदेश, विदर्भात प्रसिद्ध होत्या पंढरपूरला जाणारे सर्व वारकरी प्रथम समाधीचे दर्शन घेतात व पुढे प्रस्थान करतात.

महाराष्ट्रा आषाढीवारीची मोठी परंपरा असून या मार्गावरून लाखो वारकरी पायी जात असतात. ऊन-पाऊस झेलत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना खड्डे, चिखल, खडी असलेल्या रस्त्याचा सामना करत या मार्गावरील रस्त्यावरून जावे लागत आहे. शासनाने या रस्त्याला पालखी मार्ग घोषित करावा व चांगला रस्ता तयार करून वारकऱ्यांना पुढच्या आषाढी वारीला भेट द्यावी.

अमरजित साळुंखे, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!