करमाळा शहरातील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या सोडवणे अत्यावश्यक

करमाळा शहरातील वाहतूक कोंडीचे प्रवीण अवचर यांनी टिपलेले छायाचित्र

करमाळा (प्रवीण अवचर) गेले अनेक वर्षापासून करमाळा शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या आहे. करमाळा शहरातील व्यापार पेठा या असतानाच अरुंद आहेत. त्यातच व्यापारी दुकानदारांनी दुकानाच्या समोर पुन्हा अतिक्रमणात ओटे बांधलेले आहेत. अगोदरच अरुंद असलेला रस्ता जास्तच अरुंद होऊन वाहतुकीची दररोज मोठी कोंडी होत असते. त्यात शुक्रवारी बाजार दिवस असल्याने वाहतुकीचा पूर्ण चक्का जॅम होतो.

करमाळा शहरात एकेरी वाहतुकीचे नियमांचे तसेच सम -विषम तारखेच्या पार्किंग चे नुसतेच नावालाच फलक लावलेले आहेत. वाहनधारकांना पोलीस प्रशासनाची पूर्वीसारखी वचक नसल्यामुळे हल्ली कोणतेही नियम पाळले जात नाहीत. अल्पवयीन शाळकरी मुलं बिनधास्त ट्रिपल सीट शहरातील मेन रोड वरून सुसाट गाड्या पळवत असतात यातच चौका चौकात फेरीवाल्यांच्या गाडया लागलेल्या असतात. यामुळे पादचाऱ्यांना चौक पार करताना जीव मुठीत धरून चालावे लागते. नेमके याच भागात शहरातील महत्त्वाचे हॉस्पिटल,बँका मेन रोड परिसरातच असल्यामुळे नेहमीच पेशंट आबाल वृद्ध यांची वर्दळ राहते. दुसरी बाजू म्हणजे शहरात वाहतुकीची कडक अंमलबजावणी करायची झाल्यास या नियमांना व्यापारी वर्गातून विरोध होताना दिसतो. कारण वाहतुकीचे नियम लावले तर व्यापार पेठेतील
दुकानांमध्ये ग्राहक येत नाहीत.

अगोदरच करमाळा शहरात गर्दी वाढत असल्यामुळे आणि वाहतुकीची समस्या असल्यामुळे शहरातील काही व्यापाऱ्यांनी करमाळ्याच्या हद्द वाढ भागात आपली दुकाने थाटलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कल हा तिकडेच जास्ती वाढताना दिसुन येत आहे. दैनंदिन वाहतूक समस्येला स्थानिक रहिवाशांसह सर्वच नागरिक वैतागलेले असून नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने लक्ष घालून वाहतूक कोंडीची समस्या सोडवायला हवी.असे तमाम करमाळावासीयांची मागणी आहे.

२००८-०९ या काळात नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव होते त्यांनी अतिक्रमणाच्या बाबतीत कठोर भूमिका घेत व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलेले दुकाना बाहेरील ओटे काढण्यात आलेले होते. त्यामुळे व्यापार पेठेतील अरुंद रस्ते काहीसे रुंद झाले होते .तसेच नगरपालिका कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्या संगणमताने शहरात वाहतुकीचे नियम ही लागू केले होते. एकेरी वाहतूक सम- विषम तारखेची पार्किंगचे नियम लागू केले होते. परंतु अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर पुन्हा करमाळा शहरात वाहतूक कोंडीची अवस्था जैसे थे झाली त्यानंतर वाहतूक कोंडीवर कोणताही उपाय करण्यात आलेला नाही.

गेल्या अनेक वर्षापासून करमाळा शहरात मेन रोड वरती वाहतूक कोंडीची समस्या होत आहे त्याचा त्रास आम्हालाही मोठ्या प्रमाणात होत आहे .पार्किंगचे सुविधा नसल्यामुळे येणारे ग्राहक हे आमच्या दुकानासमोरच त्यांच्या दुचाकी लाऊन ईतर ठिकाणी फिरत बसतात यासाठी पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांनी संगणमता ने करमाळा शहरातील एकेरी वाहतुकीच्या नियमावली ठरवून द्यायला हवी सकाळी दहा ते रात्री सहा पर्यंत शहरातील मेन रोड वरती एकेरी वाहतुकीसाठी चार चाकी व तीन चाकी वाहनांना प्रवेश बंद करायला हवे. फक्त टू व्हीलर ला परवानगी द्यायला हवी यामुळे शहरातील मेन रोड वरती वाहतूक कोंडीला थोडाफार तरी आळा
बसेल.

मिलिंद देवी, व्यापारी,करमाळा
वाहतूक कोंडीविषयी संदेश न्यूज ने बनवलेली व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!