तरूण, युवक-युवतींनी जागरूक होवून समाजाची दिशा बदलणे गरजेचे – पुरुषोत्तम खेडेकर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : समाजामध्ये आता जागरूक होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता सर्व तरूण, युवक-युवतींनी जागरूक होऊन समाजाची दिशा बदलणे गरजेचे आहे. आजही समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. याचे सुध्दा गंभीर चिंतन करावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे समतेचे व न्यायाचे होते. शिवरायांनी केलेल्या लढाया या जातीवर किंवा कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हत्या, तर त्या अन्याय व जुलूम यांच्या विरोधात होत्या; असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.

करमाळा येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सामाजिक व राजकीय संघटनांचा जाहीर मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या मेळ्यात मार्गदर्शन करताना श्री. खेडेकर बोलत होते. पुढे बोलताना खेडेकर म्हणाले, की शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवरच समाजाने चालले तर भविष्यामध्ये भले होईल.यासाठी मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता पुढे आले पाहिजे. करमाळा तालुक्यामध्ये समविचारी संघटनांनी राबवलेला उपक्रम हा अतिशय चांगला आहे. यासाठी मराठा सेवा संघाने कायमस्वरूपी पुढाकार घ्यावा. अशाच रितीने सर्व राजकीय, सामाजिक व गटातटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच शिवरायांचे समतचे राज्य आल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट मत खेडेकर यांनी मांडले.
यावेळी माजी आमदार रेखा खेडेकर, मराठा सेवा संघ प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुनराव तनपुरे, पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने, पुणे विभाग संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरण घाडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील, प्रा.शिवाजीराव बंडगर, ॲड.राहुल सावंत, बाळासाहेब सुर्वे, ॲड.सविता शिंदे, अंजली श्रीवास्तव, स्वातीताई फंड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांचे आभार मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष सचिन काळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन खटके, गणेश कुकडे, सतीश वीर, अजित कणसे यांनी परिश्रम घेतले.
