करमाळा शहरातील विकास कामांसाठी जगताप यांच्याकडून २१ कोटींची मागणी -

करमाळा शहरातील विकास कामांसाठी जगताप यांच्याकडून २१ कोटींची मागणी

0

करमाळा(दि. २८): करमाळा शहरातील विविध रखडलेल्या व नव्याने प्रस्तावित विकासकामांसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

पंढरपूर दौऱ्यानिमित्त झालेल्या भेटीत जगताप यांनी शहरातील प्रमुख समस्यांवर प्रकाश टाकत, निधीविना अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी लेखी निवेदन दिले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, तात्काळ प्रशासकीय मंजुरी देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

या निधीमधून करमाळा शहरातील खालील कामांचा समावेश आहे :

  • रखडलेली भुयारी गटार योजना,
  • अमृत टू अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना,
  • जलशुद्धीकरण प्रकल्प,
  • आणि प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती.

यासोबतच, शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर झाले असून त्यालाही मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले.

निवडणुका शिवसेनेच्या चिन्हावर लढणार

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या शिवसेना प्रवेशानंतर करमाळा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्ष मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुका शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या जाणार असल्याचे जगताप यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्यासह आगामी सर्व निवडणुका लढवण्याबाबतही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!