जयवंतराव जगताप यांनी घेतली सुशीलकुमार शिंदे व खा.प्रणिती शिंदे यांची भेट - चर्चा मात्र गुलदस्त्यात... -

जयवंतराव जगताप यांनी घेतली सुशीलकुमार शिंदे व खा.प्रणिती शिंदे यांची भेट – चर्चा मात्र गुलदस्त्यात…

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.9) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आज (ता.9) सकाळी सोलापूर येथे जनवात्सल्य निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. एकांतात तब्बल अर्धा तास झालेल्या भेटीचा तपशील मात्र गुलदस्त्यातच आहे, चर्चेवेळी खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या.

या भेटीने करमाळा तालुक्यात राजकीय क्षेत्रात चर्चाना उधाण आले असून, लोकसभेतील विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या शिंदेंनी पक्षवाढीसाठी आपल्या मुळ काँग्रेसी जुन्या सहकाऱ्यांची मोट बांधणे सुरू केल्याचे दिसून येत आहे. शिंदेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेल्या करमाळा मतदारसंघातून जयवंतराव जगताप यांना ताकद देत पुन्हा काँग्रेस बळकटीचे त्यांचे धोरण आहे, अशीही चर्चा व्यक्त केली जात आहे.

शिंदे -जगताप यांच्या भेटीने माजी आ.जगताप काँग्रेसतर्फे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना समर्थन दिले होते. या निवडणुकीवेळी जगताप यांची शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतली होती. यावेळी जगताप यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे व जगताप यांची भेट फक्त सदिच्छा भेट नसून, श्री.जगताप यांच्यासारख्या सक्षम उमेदवारांची नावे पुढे करून जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्याचा काँग्रेसच्या रणनितीचा देखील हा एक भाग असू शकतो असे अनेक राजकीय गुपिते दडले असल्याची चर्चा आहे.

साहेबांचे व माझे खूप जुने ऋणानुबंध…. साहेबांचे व माझे खूप जुने ऋणानुबंध व भावनिक नाते असून, स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे जरी पक्षीय पातळीवर काही वेगळे निर्णय घेतले गेले असले, तरी माझी त्यांच्यावरील श्रद्धा व त्यांचे माझेवरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही व होणारही नाही, भावनिकदृष्ट्या व वैचारिक दृष्टया माझी सुशिलकुमार शिंदे, शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशीच नाळ आहे. – जयवंतराव जगताप..(माजी आमदार, करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!