जनशक्तीचे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसह पुण्यात आंदोलन – ३० सप्टेंबरपर्यंत ऊस बिल देण्याचे मकाई, कमलाईकडून आश्वासन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मागील गळीत हंगाम पूर्ण होऊन 7 ते 8 महिने झाले तरी करमाळा तालुक्यातील मकाई व कमलाई या दोन कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले अद्यापही अदा केली नाहीत असा आरोप करत या कारखान्यांच्या विरोधात जनशक्ती संघटनेने आज (दि.५ सप्टेंबर) पुणे येथील साखर संकुल येथे आंदोलन केले.
साखर आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत ५०% बिले येत्या सात दिवसात अदा करण्याचे व बाकी सर्वच्या सर्व बिले ३० सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असे कारखानदारांकडून आश्वासित करण्यात आले.
या आंदोलना विषयी अधिक माहिती देताना जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील म्हणाले की, मकाई सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस बिलाचे 26 कोटी रुपये देणे बाकी असून कमलाई सहकारी साखर कारखान्याकडून आठ कोटी रुपये देणे बाकी आहे. याचबरोबर शेतकऱ्यांच्या नावावर हजारो कोटींचे कर्ज घेतले असल्याचा देखील त्यांनी आरोप यावेळी केला.
जनशक्ती संघटनेने साखर आयुक्त येण्याअगोदर साखर आयुक्त कार्यालयाच्या गेटवर ठिय्या मांडला. आंदोलकांनी हातात गाडगे घेऊन भिक मागो आंदोलन सुरू केले. यामध्ये भीक मागून जमा झालेली रक्कम कारखान्याचे चेअरमनना देणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. तसेच सुरुवातीला साखर आयुक्त आले नसल्यामुळे जर साखर आयुक्त आले नाही तर त्यांचे खुर्चीचा लिलाव करून त्या पैशातून चेअरमन ना पैसे पाठवू असे देखील खूपसे पाटील यांनी बोलताना सांगितले.

काही वेळाने साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत गुलकुंडवार साखर संकुलात आले. त्यानंतर त्यांनी मकाईचे चेअरमन श्री दिनेश भांडवलकर, कार्यकारी संचालक खाटमोडे आणि कमलाई चे कार्यालयीन अधीक्षक यांच्यासोबत जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची समारोसमोर बैठक लावली.या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. साखर आयुक्तांनी कारखानदारांना शेतकऱ्यांची सर्व देणी देण्याचे आदेश दिले अन्यथा येणाऱ्या गळीत हंगामाची परवानगी मिळणार नाही अशी तंबी दिली.यावेळी यावर तोडगा काढत आंदोलक शेतकऱ्यांची 50% बिले येत्या सात दिवसात अदा करण्याचे आश्वासन दिले तर सर्वच्या सर्व बिले 30 सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असेकारखानदारां कडून आश्वासित करण्यात आले..

यावेळी विनिता बर्फे,शर्मिला नलवडे,गणेश वायभासे ,राणा वाघमारे,अनिल शेळके,अतुल राऊत,शरद एकाड,बिभीषण शिरसाट, दीपाली डिरे,किशोर शिंदे,अजीज सय्यद साहेबराव इटकर,बालाजी तरंगे,वैभव मस्के,रणजित पवार,हनुमंत कांतोडे,विजय खूपसे,रेश्मा दिवे, श्रावणी दिवे,रुक्मिणी शिंदे,भाऊसाहेब जाधव आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते.





