जरांगे-पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार, बागल- शिंदे गटात उत्साह, झोळ गटात निराशा.. - Saptahik Sandesh

जरांगे-पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार, बागल- शिंदे गटात उत्साह, झोळ गटात निराशा..

करमाळा (दि.४) – विधानसभा निवडणुकीतून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे – पाटील यांनी माघार घेतली आहे. ही बातमी समजताच करमाळा मतदार संघातील विद्यमान आमदार संजयमामा शिंदे व महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या गटात उत्साह निर्माण झाला आहे. तर प्रा.रामदास झोळ गटात निराशा निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणुक लढविण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबतही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान काल (ता. ३) अंतरवाली सराटी येथे इच्छुकांची व मराठा आंदोलक कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची व कोणाला पाडायचे, याची घोषणा श्री.जरांगेपाटील यांनी केली. विशेष म्हणजे करमाळा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे व महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल या दोन्ही गटात निरूत्साह निर्माण झाला होता.

करमाळा मतदारसंघात जरांगे – पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशा स्थितीत जरांगे-पाटील यांनी उमेदवार दिला असतातर त्या उमेदवारास बागल व शिंदे या दोन्ही उमेदवारांची मते मिळाली असती. पर्यायाने मराठा मताचे विभाजन होऊन या दोन्ही उमेदवारांना धोका निर्माण झालेला होता. दरम्यान आज (ता. ४) जरांगे-पाटील यांनी सपशेल माघार घेत निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे.

जरांगे-पाटील यांचे समर्थक म्हणून प्रा. रामदास झोळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, परंतु जरांगे-पाटील यांचा पाठींबा नसल्याने व त्यांनी मी कोणालाही पाठींबा द्या अथवा पाडा.. हे सांगणार नाही, कोणालाही उभे राहण्यास सांगत नाही. प्रत्येकाने आपले उमेदवारी अर्ज काढून घ्यावेत. ठेवल्यास आपल्या जबाबदारीवर लढावे; असे जाहीर केले आहे. त्यामुळे झोळ गटात निराशा निर्माण झाली आहे. असे असलेतरी ते तिसऱ्या आघाडीचा पाठींबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!