पुणे भागातील धरणामधुन उजनी धरणात 10 टिएमसी पाणी सोडावे – झोळ यांनी केली मागणी
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण सध्या मायनसमध्ये गेल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी सर्वसामान्य जनता याकरिता पुणे भागातील 19 धरणातील दहा टीएमसी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी प्रा. रामदास झोळ यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे कार्यकारी संचालक अतुल कपोते यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की सोलापूर जिल्हा प्रशासनाने बार्शी, माळशिरस, सांगोला,माढा,करमाळा आदी तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केले आहे यंदाच्या वर्षी उजनी धरण क्षेत्रात समाधानकारक रित्या पाऊस न झाल्याने उजनी धरणात 15%,, इतका अतिअल्प साठा शिल्लक आहे.उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड आदी शहर व ग्रामीण भागाच्या पिण्याच्या उद्योगाचा व शेतीसाठीचा पाणी पुरवठा अवलंबून आहे.तसेच सोलापूर पुणे, नगर जिल्ह्यातील पेयजल योजनेअंतर्गत समावेश असलेल्या गावांना सुध्दा उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.आगामी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता उजनी धरणातील पाणीसाठयावर सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील उपरोक्त बाबी अवलंबून असताना अतिअल्प राहिलेल्या पाण्याचे नियोजन कसे होणार आहे.
यावर्षी महाराष्ट्र शासनाने जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा कमी असुन देखील या धरणांमधुन 8.6 टी एम सी पाणी सोडण्यात आले आहे.पावसाळयात पुणे जिल्ह्यातील ज्या धरणाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी उजनीत सोडले जाते.यंदा सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्याच 19 धरणातील आता उजनीसाठी 10 टि एमसी पाणी जायकवाडी पॅटर्नप्रमाणे उजनीत सोडण्यात यावे.म्हणजेच यामुळे सोलापूर, पुणे,व नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग, पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या भविष्यात उद्भवणारे अडचणी दूर होतील.उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील 19 धरणातुन 10 टि एमसी पाणी सोडण्याच्या बाबत संबंधीताची लवकरात लवकर बैठक घेऊन आमच्या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा अन्यथा सिंचन भवन पुणे येथे निवेदन दिल्यापासून पंधरा दिवसांच्या आत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे.