“नोकरी २५ वर्षांची… पण शेती आयुष्यभराची” –कवी प्रा. संदीप जगताप

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.30 :”नोकरी ही फक्त २५ वर्षांची असते पण शेती ही आयुष्यभराची असते आणि आगामी काळ हा फक्त शेतीचाच असणार आहे. त्यामुळे नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य दिले पाहिजे व सोबत उद्योग जोडला पाहिजे,” असे आवाहन कवी प्रा. संदीप जगताप यांनी केले.

सर्वोदय प्रतिष्ठान आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैय्यालाल देवी हे होते.
पुढे बोलताना प्रा. जगताप म्हणाले, “आज मुलांना आणि मुलींना हे समजणे गरजेचे आहे की कुठलीही नोकरी ही नोकरीच असते, त्यात आपण मालक नसतो. आपण मालक व्हायचे की नोकर व्हायचे हे ठरवणे महत्त्वाचे आहे. आपल्या आई-वडिलांप्रती प्रेम आणि आपुलकी ठेवणे ही खरी संस्कृती आहे. सुशिक्षित लोकांचे आई-वडील वृद्धाश्रमात आहेत, पण कष्टकरी व कमी पगारवाले पालकांना सोडत नाहीत – हीच खरी जीवनमूल्ये आहेत.”


त्यांनी पुढे सांगितले, “केवळ पैसा आणि नोकरी महत्त्वाची नाही, तर संस्कृती, पालकांचा सन्मान आणि समाजाशी नाळ जोडणे गरजेचे आहे. राजकारणातही जर आपली काळजी घेणारे व प्रेम करणारे नेतृत्व असेल, तर नक्की कार्यकर्ते व्हा. राजकारणात उतरलात तरी चांगले रहा,” असेही आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात शेती, शेतकरी आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित त्यांच्या कविताही सादर झाल्या.अध्यक्षीय भाषणात श्री. देवी यांनी सर्वोदय प्रतिष्ठानचे विशेष कौतुक केले.
प्रास्ताविक अमरजित सांळुके यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले तर आभार सागर पुराणीक यांनी मानले.


या वेळी जेष्ठ कवी प्रा.डाॅ. सुरेश शिंदे, विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे, यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड, प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिपक चव्हाण सचिव अमरजित साळुकें ,जेष्ठ कवी प्रकाश लावंड, अंधश्रद्धा निर्मूलन चे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल माने, कवी खलील शेख, कवी दिपक लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

