उत्तर प्रदेश, राजस्थानप्रमाणे डिजिटल मीडिया धोरण जाहीर करावे – पत्रकार संघटनेची मागणी
करमाळा (दि.२०) – राजस्थान, उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी डिजिटल मिडिया धोरण जाहीर करून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात देण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार-संपादक संघटनेच्यावतीने आमदार संजयमामा शिंदे यांना दिले.
करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की राज्यातील महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणीपासून शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, बांधकाम कामगार, शिक्षक, शासकिय, निमशासकिय कर्मचारी अगदी रिक्षा व टॅक्सी चालकांपर्यंतच्या विविध घटकांसाठी आपण अनेक योजना राबविल्या असून सर्वांना न्याय दिला आहे. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पत्रकार दुर्लक्षित राहीला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी धोरण ठरविण्याची गरज आहे. महानगरातील झोपडपट्ट्या व उच्चभूवर्गापासून ते थेट राज्यातील वाड्या-वस्त्यांवर प्रभावीपणे पोहोचलेल्या डिजिटल मिडिया पत्रकारांकडे मात्र आपले दुर्लक्ष झाले आहे.
देशातील अनेक राज्यांनी आपले डिजिटल मिडिया धोरण जाहीर करून डिजिटल पत्रकारांना दिशा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तर प्रदेशचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करून तिथल्या डिजिटल मिडियाला आधार दिला. राजस्थान व उत्तर प्रदेशच्या धर्तीवर त्यापेक्षाही व्यापक धोरण युध्दपातळीवर आपण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी, ही आमची आपणाकडे आग्रही मागणी आहे. तसेच विधीमंडळ अधिवेशनात सरकारने जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांना तातडीने दरमहा २० हजार रुपये सन्मान मानधन सुरु करावे. करमाळा तालुक्याचे आमदार म्हणून पत्रकाराच्या कल्याणासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडवणिस यांच्याकडे पाठपुरावा करुन आमच्या मागण्या मान्य करुन राज्यातील पत्रकारांना पाठबळ देवून आधार व न्याय द्यावा, ही अशी मागणी केली आहे.
यावेळी डिजिटल करमाळा तालुका डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटना तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके,उपाध्यक्ष शितल कुमार मोटे, सचिव नरेंद्र सिंह ठाकुर सहसचिव सूर्यकांत होनप,हर्षवर्धन गाडे,तुषार जाधव, संघटक अंगद भांडवलकर, खजिनदार एडवोकेट सचिन हिरडे, राजू सय्यद, राहुल रामदासी, सागर गायकवाड उपस्थित होते. हे निवेदन डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा माने यांच्या आदेशानुसार संघटनेचेवतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी याबाबत डिजिटल मीडिया पत्रकार धोरणाबाबत शासन सकारात्मक असून याबाबत धोरण निश्चित करण्याचे काम चालू आहे. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या भावना लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडे पोहोचवणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पाठपुरावा करून आपणास न्याय मिळवून घेणार असल्याचे सांगितले आहे.