न्याय मागण्यासाठी आलेल्या पक्षकारांना न्यायव्यवस्था व वकिलांनी वेळेत न्याय दिला पाहिजे – न्यायमुर्ती पृथ्वीराज चव्हाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.५) : न्याय मागण्यासाठी आलेल्या पक्षकारांना न्यायव्यवस्था व वकिलांनी वेळेत न्याय दिला पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले, करमाळा येथे वरिष्ठ स्तर न्यायाधीश या न्यायालयाच्या शुभारंभ प्रसंगी न्यायमूर्ती श्री.चव्हाण बोलत होते.

यावेळी व्यासपीठावरती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश ॲड.डॉ.शब्बीर अहमद औटी हे होते. व्यासपीठावर महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार कौंसिलचे माजी अध्यक्ष मिलिंद थोबडे तसेच करमाळा येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश उमेश देवर्षी वकील संघाचे अध्यक्ष विकास जरांडे होते.

याप्रसंगी पुढे बोलताना श्री.चव्हाण म्हटले कि, आजचा हा सोहळा आपण केलेल्या परिश्रमाचे व पाठपुराव्याचे प्रतिक आहे, न्याय अधिकाऱ्यांनी तसेच वकिलांनी आपल्याला घटनेने दिलेले जे अधिकार आहेत, याचा योग्य वापर करून समाजातील सर्वच तळागाळातील नागरिकांचे दु:ख कसे हलके करता येईल, त्यांना न्याय कसा देता येईल हे पाहिले पाहिजे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी आलेल्या पक्षकारांना न्यायव्यवस्था व वकिलांनी वेळेत न्याय दिला पाहिजे असे श्री.चव्हाण यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमासाठी सोलापूर बार्शी, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माढा, परांडा, इंदापूर, माळशिरस, बारामती, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, येथील सर्व न्यायाधीश मंडळी तसेच जिल्ह्यातील सर्व बार असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे स्वागत करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास जरांडे, उपाध्यक्ष पी.बी.जाधव, सचिव योगेश शिंपी, सहसचिव विनोद चौधरी, ग्रंथपाल पी.के.पवार तसेच करमाळा बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच करमाळा येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश उमेश देवर्षी, कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या न्यायाधीश एम.पी.एखे, सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांनी केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे, न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण तसेच सोलापूर न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश ॲड.डॉ.शब्बीर औटी यांचे हस्ते न्यायालयातील कोनशिला उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच पुढे वरिष्ठ स्तर न्यायाधीश न्यायालयाचा फित कापून उद्घाटन करण्यात आले व न्यायमुर्तीना हलगीच्या व बॅंड पथकाने वाजत जागत कार्यक्रमस्थळी नेण्यात आले.
याप्रसंगी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयाचे न्यायाधीश तसेच सर्व बार असोसिएशनचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी, आमदार संजयमामा शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तहसिलदार समीर माने, यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, तानाजीबापू झोळ, नगरसेवक संजय सावंत भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, प्रवीण कटारिया, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सद्स्यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमाला करमाळा न्यायालय न्यायाधीश एम.पी.एखे, सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री तसेच न्यायालयीन स्टाफ कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
न्याय व्यवस्थेची दोन चाके म्हणजेच न्यायाधीश आणि वकील हे आहेत – न्यायमूर्ती शिवकुमार डिगे…
करमाळा येथे आता वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु झाले आहे, आता करमाळा बार असोसिएशनच्या वकिलांची जबाबदारी वाढली आहे, या पुढे वकिलांनी लोकांना लवकरात लवकर न्याय देण्याचे काम करायला पाहिजे, ‘करमाळा बार’ चे सदस्य आतापर्यंत वकिली करून ‘ॲग्रीकल्चर’ करत होते, परंतु आता ॲग्रीकल्चर न राहता आता ‘कोर्टक्लचर’ मध्ये काम करावे लागेल. न्याय व्यवस्थेची दोन चाके म्हणजेच न्यायाधीश आणि वकील हे आहेत, न्यायव्यवस्था जर गतिमान करायची असेल तर या दोघांनी व्यवस्थित काम करणे गरजेचे आहे. न्यायव्यवस्था गतिमान असेल तर समाज सुदृढ राहतो त्यामुळे आपल्याला न्यायव्यवस्था गतिमान करणे गरजेचे आहे. असेही न्यायमूर्ती डिगे यांनी म्हटले आहे.
करमाळा येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन संपन्न – कार्यक्रमातील क्षणचित्रे व मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची भाषणे खालील व्हिडीओ मध्ये दिले आहेत.
करमाळा तालुक्यातील घडामोडी पाहण्यासाठी आमचे instagram पेज ला फॉलो करा

