भारत-पाक युध्दात लढलेल्या सैनिकांचा कुंभेज येथे सन्मान…ज्योतिर्लिंग गणेश मंडळाचा आदर्श उपक्रम…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : 1971 मध्ये झालेल्या भारत पाक युद्धात भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवत शत्रुसैन्यावर मात करत भारतभूमीचे रक्षण केले. या युद्धात कुंभेजचे वीर जवान मेजर मोहन गोपाळ मुटके आणि मेजर जालींदर संभाजी कन्हेरे हे जीवाची बाजी लावून प्रत्यक्ष लढले. त्यानंतर 1999 मध्ये झालेल्या कारगील युध्दात कुंभेजचे आणखी एक वीर जवान मेजर अक्रुर शंकर शिंदे यांनी
प्रयत्नाची शर्थ करून शौर्य गाजवले.
अशा या शूरवीरांचा कुंभेज या जन्मभूमीत मानपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. ज्योतिर्लिंग गणेश मंडळाने हा देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचा आदर्श इतरांना घालून दिला आहे. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळ सेवेतून कुमारी काजल किसन शिंदे हिची कालवा निरीक्षक म्हणून तर नागपूर शहर पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल कुमारी प्राची मोहन कादगे यांचा मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी माजी सैनिक मेजर बाळासाहेब शिंदे ,मेजर, बिभीषण कन्हेरे, मेजर देवराव शिंदे, मेजर सुभाष मुटके उपसरपंच संजय तोरमल, व सत्कारमूर्तीचे कुटुंबीय तसेच मंडळाचे अध्यक्ष रामदास वाघमारे उपाध्यक्ष एकनाथ तोरमल , सचिव गणेश शिंदे व मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्य मोठ्या संख्येने हजर होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मुटके यांनी तर आभार गणेश शिंदे यांनी मानले.