800 किमी सायकलने प्रवास करत काका काकडे यांनी दिले आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांना वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमंत्रण.. - Saptahik Sandesh

800 किमी सायकलने प्रवास करत काका काकडे यांनी दिले आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांना वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमंत्रण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : देशातील तरूण पिढी निरोगी रहावी व पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला थांबविण्याचे प्रयत्न गरजेचे आहेत. या दृष्टीने वीट येथील दादाश्री फाऊंडेशनच्या वतीने जुलै महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये १ लाख ११ हजार १११ झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांना देण्यासाठी दादाश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष काकासाहेब काकडे यांनी तब्बल ८०० कि.मी. चा सायकल प्रवास करत त्यांची भेट घेतली.

१७ एप्रिल रोजी काकडे यांनी हा प्रवास सुरू केला. त्यानंतर २४ एप्रिलला ते आंध्रप्रदेश येथील विजयवाडा येथील ताडापल्ली येथे पोहोचले. रस्त्याने जाताना ठिकठिकाणी पुष्पहार देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. वीट येथून सुरू केलेला प्रवास सात दिवसात पूर्ण करत आणि दररोज १०० ते ११० कि.मी चे अंतर पार करत काकडे यांनी ताडापल्ली गाठले. हा सायकल प्रवास करताना काका सरडे यांना आयएएस बालाजी मंजुळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत रेड्डी यांच्या भेटीचा मार्ग सोपा केला. कोणतीही बॅकअप गाडी सोबत न घेता काकडे यांनी हा सायकल प्रवास पूर्ण केला. मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी भेटी दरम्यान काकडे यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. जुलै महिन्यात जेऊर येथे आंध्रप्रदेश राज्य पंचायत राज समिती अतिरिक्त सचिव बालाजी मंजुळे यांच्या मातोश्रींच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रमासोबतच वृक्षारोपणासाठी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी उपस्थित राहणार असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!