२६ जुलैला करमाळा येथे ‘कारगिल विजय दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानबरोबर झालेल्या कारगिलच्या युद्धात विजय मिळविला होता. या युद्धात अनेक जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावून युद्ध जिंकून दिले होते. अनेक जवान या युद्धात शहीद झाले होते. अशा या युद्धाची व शहिद जवानांची आठवण राहावी म्हणून दरवर्षी २६ जुलै हा दिवस कारगिल दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. करमाळा येथे देखील यंदा येत्या शुक्रवारी (26 जुलै) सकाळी दहा वाजता यश कल्याणी सेवा भवन करमाळा येथे 25 वा कारगिल विजय दिवस साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा व यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यश काढलेली सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश-करे पाटील हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आजी-माजी सैनिक संघटना सोलापूरचे अध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे हे असणार आहे. याबरोबरच आमदार संजयमामा शिंदे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार शिल्पा ठोकडे,गटविकास अधिकारी मनोज राऊत, ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष डॉ.अॅड.बाबूराव हिरडे, आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे करमाळा तालुका अध्यक्ष अक्रूर शिंदे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. यात नूतन कृषी सहाय्यक अश्विनी कुंभार, पत्रकार गजेंद्र पोळ, माजी सैनिक रुग्णवाहिका सेवेचे साजिद शेख, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

