करमाळा नगरपालिकेवर शहर विकास आघाडीचा फडकला झेंडा – नगराध्यक्षपदी मोहिनीताई सावंत.. -

करमाळा नगरपालिकेवर शहर विकास आघाडीचा फडकला झेंडा – नगराध्यक्षपदी मोहिनीताई सावंत..

0


करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : (ता.२१) : नगरपरिषद निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीने अर्थातच सावंत गटाने आपला झेंडा फडकवला असून नगराध्यक्षपदी सौ. मोहिनी संजय सावंत या ६५२० मतांनी विजयी झाल्या असून त्यांचे आठ नगरसेवक विजयी झाले आहेत. या विजयाने सावंत यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.
शहर विकास आघाडीनंतर भाजपाचे सात नगरसेवक तर शिवसेनेचे पाच नगरसेवक विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीने आठ जागांवर अधिकृत उमेदवार उभे केले होते, पण त्यांना खाते उघडता आले नाही. तसेच अपक्षालाही यावेळी संधी मिळाली नाही. नगरसेवक निवडीत सध्या तरी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.


नगरपरिषद निवडणुकीत यावेळी केवळ सत्ता बदल झाला नाही, तर शहरातील मतदारांनी स्वतंत्र विचारशक्ती व प्रगल्भता दाखवून दिली आहे.
मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. मतमोजणी प्रक्रियेवेळी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नागरिकांचा उत्साह, कार्यकर्त्यांची धावपळ आणि प्रत्येक फेरीत बदलणारे आकडे – या साऱ्यामुळे करमाळ्याने लोकशाहीचा उत्सव अनुभवला.


क्रॉस व्होटिंग ही या निवडणुकीची खरी ओळख..
या निवडणुकीचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे एका प्रभागात वेगवेगळ्या पक्षांना मिळालेला कौल. एकाच प्रभागात ‘अ’ आणि ‘ब’ गटात वेगवेगळे उमेदवार विजयी होणे, हे मतदारांनी पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्ती, काम आणि विश्वास पाहून मतदान केल्याचे स्पष्ट संकेत देतात.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘३अ’ मध्ये भाजपाच्या निर्मला गायकवाड ३५४ मतांनी विजयी, तर ‘३ब’ मध्ये शहर विकास आघाडीच्या पूजा इंदुलकर अवघ्या १९ मतांनी विजयी – येथे प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित झाले.
प्रभाग ५ मध्ये ‘५अ’ मध्ये शिवसेनेच्या साजेदा कुरेशी ८१ मतांनी विजयी, तर ‘५ब’ मध्ये शहर विकास आघाडीचे विक्रमसिंग परदेशी १२७ मतांनी विजयी झाले.
प्रभाग ६ मध्ये ‘६अ’ मधून सुवर्णा अलाट फक्त ३६ मतांनी विजयी, तर ‘६ब’ मध्ये प्रशांत ढाळे यांचा ५५५ मतांनी विजय – एकाच प्रभागात मतफरकातील प्रचंड तफावत प्रकर्षाने जाणवली.
प्रभाग ८ मध्ये भाजपाच्या सुनिता ढाणे ४७५ मतांनी तर दीपक चव्हाण ११६ मतांनी विजयी झाले. हा फरक म्हणजे मतांची अदलाबदल स्पष्टपणे दिसून आली.


सर्वाधिक आणि अल्पाधिक्याचे विक्रम..
सावंत गटाचे संजय सावंत हे सर्वाधिक म्हणजे १२३० मताधिक्य मिळवून विजयी झाले. सर्वात कमी मतांनी विजय : पूजा इंदुलकर या अवघ्या १९ मताधिक्याने विजयी झाल्या. महिलांमध्ये सर्वाधिक ८८६ मताधिक्य शहर विकास आघाडीच्या ज्योत्स्ना लुणिया यांना मिळाले आहे.
शिवसेनेत सर्वाधिक मताधिक्य प्रशांत ढाळे यांना ५५५ मतांचे मिळाले आहे.
सर्वात कमी मतांनी पराभव : शिवसेनेच्या उमेदवार माजी नगरसेविका सौ. संगीताताई खाटेर यांचा अवघ्या १९ मतांनी पराभव झाला आहे.
हा आकडा सांगतो की करमाळ्यात एक मतही सत्ता बदलू शकते.
करमाळा नगरपरिषद निवडणूक ही केवळ राजकीय पक्षांची लढाई नव्हती, तर जनतेच्या अपेक्षा, कामाचा हिशेब आणि भविष्यासाठीचा विश्वास यांचा निर्णय होता. या निकालाने स्पष्ट केले आहे की करमाळ्याचा मतदार आता जागरूक आहे. तो पक्ष पाहतो, पण आंधळेपणाने नाही; तो माणूस पाहतो, काम पाहतो आणि मगच मतदान करतो, हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!