पूरग्रस्तांना मदतीसाठी करमाळा सकल मुस्लिम समाजाचा पुढाकार

करमाळा(दि.30) : सीना नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आवाटी परिसरातील नागरिकांची तात्पुरती राहण्याची सोय स्थानिक दर्ग्यात करण्यात आली आहे. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या पूरग्रस्तांसाठी करमाळा मुस्लिम समाजाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त दोन दिवस खिचडीचे वाटप करण्यात आले.

करमाळा तालुक्यात सीना नदीला सलग तीन वेळा पूर आला आहे. या पूरस्थितीमुळे नदीकाठील गावांमध्ये पाणी शिरून अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांसह शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत.
अशा परिस्थितीत नागरिकांची सोय जवळील सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी मंगल कार्यालये, शाळा, मंदिरे तसेच दर्गा आदी ठिकाणी विस्थापितांना निवारा देण्यात आला आहे. आवाटी परिसरातील दर्ग्यात तेथील पूरग्रस्त नागरिकांना हलविण्यात आले आहे.

या संकटाला सावरण्यासाठी करमाळ्यातील सकल मुस्लिम समाजाने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील बांधवांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून आर्थिक मदत केली. करमाळा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आवाटी येथील दर्गा परिसरातील पूरग्रस्तांना नवरात्रोत्सवानिमित्त दोन दिवस खिचडीचे वाटप करण्यात आले.
यावेळी सकल मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक हाजी कलीम काझी यांनी सांगितले, “आमच्या शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आमचा समाज कायम कटीबद्ध आहे. उभ्या पिकांचे, जनावरांचे व घरगुती साहित्याचे झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी समाजाच्या मदतीने प्रयत्न सुरू राहतील.”

आयशा मस्जिदचे मुफ्ती अबूरेहान यांनी यावेळी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीचा दाखला देत सांगितले की, “संकटाच्या वेळी धर्म, जात न पाहता माणसाला मदत करावी. त्याला कधीही एकटेपणाची भावना वाटू नये, हेच खरे मानवधर्म आहे.”
तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले, “संकटाच्या काळात सकल मुस्लिम समाजाने दाखवलेली सामाजिक बांधिलकी अमूल्य आहे. ही मदत विसरण्यासारखी नाही.” त्यांनी सर्व मुस्लिमसमाज बांधवांचे आभार मानले.

यावेळी समाजातील जमीयत उलमा हिंदचे तालुकाध्यक्ष मौलाना मोहसीन, जेष्ठ नेते फारुख जमादार, अॅड. अलिम पठाण, डॉक्टर समीर बागवान, नायब तहसीलदार सादिक काझी, कोर्टीचे सर्कल भाऊसाहेब युसूफ बागवान, अॅड.. नईम काझी, जामा मशीदचे मौलाना अन्वर, सन राईस क्लासचे प्रा. इब्राहिम मुजावर, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, रोहित पवार फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष मुस्तकीम पठाण, उर्दू शाळा शालेय समितीचे उपाध्यक्ष इक्बाल शेख, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, पत्रकार अलिम शेख, पत्रकार अशपाक सय्यद,
मार्गदर्शक समीर शेख, रमजान बेग, सुरज शेख, जावेद सय्यद, आरीफ पठाण, इम्तियाज पठाण, जहाँगीर बेग, अलिम पठाण, कलीम शेख, अरबाज बेग, शाहीद बेग, फिरोज बेग, कलंदर शेख, यासीन सय्यद, अमीर शेख, गुलाम सय्यद, कयुम मदारी, दाऊद मदारी, अक्रम मदारी, उपस्थित होते.

