मुस्लिम समाजाच्या दफनभूमी प्रश्नासाठी करमाळा मुस्लिम समाजाचे महसूल मंत्र्यांना निवेदन

करमाळा : करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात मुस्लिम समाजासाठी दफनभूमी (कब्रस्तान) उपलब्ध नसल्याने अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची गंभीर बाब महसूल मंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सकल मुस्लिम समाज करमाळा व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन यांच्या वतीने याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
महसूल मंत्री बावनकुळे हे करमाळा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित जनता दरबारात मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी दफनभूमीचा प्रश्न उपस्थित केला.

दफनभूमीअभावी अनेक अडचणी
तालुक्यातील अनेक गावांमध्ये दफनासाठी स्वतंत्र जागा नसल्यामुळे मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांना अनेक किलोमीटर प्रवास करून करमाळा शहरातील कब्रस्तानात जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असून काही ठिकाणी वादविवादाच्या घटनाही घडत असल्याचे सांगण्यात आले.
प्रतिनिधींनी सांगितले की, “मृत्यूनंतरही व्यक्तीचा सन्मान राखला जावा, यासाठी गावागावात दफनभूमीची व्यवस्था होणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून तो आता गंभीर स्वरूप धारण करत आहे.”
दहा ते वीस गुंठे जागेची मागणी
निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे करमाळा तालुक्यातील ज्या गावांमध्ये कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी दहा ते वीस गुंठे जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने मार्ग काढण्यासाठी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे व सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना आवश्यक सूचना दिल्याचे सांगितले.

यावेळी सकल मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक तालुकाध्यक्ष कलीम काझी, शहराध्यक्ष जमीर सय्यद, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनचे संस्थापक समीर शेख, रोहित पवार फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष मुस्तकीम पठाण, रहनुमा ट्रस्टचे सचिव सुरज शेख, जहांगीर बेग, वाजीद शेख, रमजान बेग, आझाद शेख, फिरोज मेंबर, इकबाल शेख, दिशान कबीर, अरबाज बेग, सोहेल पठाण, शाहीद बेग, कलीम शेख, अलीम शेख, इम्तियाज पठाण, चांद बेग, आम्मो मदारी, दाऊद मदारी, कय्युम मदारी, अक्रम मदारी आदी उपस्थित होते.
