करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी पूजा ढेरे; उपसभापतीपदी ॲड.अजित विघ्ने बिनविरोध

करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या वीट गणातून विजयी झालेल्या पूजा ढेरे यांची निवड झाली असून, उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड.अजित विघ्ने यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे करमाळा तालुक्यातील पंचायत समितीच्या सत्तास्थापनेवर महायुतीने आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर करमाळा पंचायत समितीत महायुतीकडे स्पष्ट बहुमत होते. एकूण १२ सदस्यांपैकी ८ सदस्य भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे सभापती व उपसभापती पदे महायुतीकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. तरीही तालुका विकास आघाडीच्या वतीने सभापती पदासाठी आदिती पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे सभापती पदासाठी पूजा ढेरे व आदिती पाटील यांच्यात निवडणूक झाली. या चुरशीच्या लढतीत पूजा ढेरे यांनी विजय मिळवत सभापतीपद पटकावले.

पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. सभापती व उपसभापती पदासाठी आयोजित बैठकीस पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या निवडणूक प्रक्रियेसाठी अध्याशी अधिकारी लक्ष्मण कसेकर सचिव म्हणून गटविकास अधिकारी अमित कदम यांनी निवडणूक प्रक्रियेस सहकार्य केले. यावेळी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे उपस्थित होत्या. नियोजित कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज स्वीकृती, छाननी आणि निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.

दरम्यान, उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयमामा शिंदे समर्थक आणि केतूर गणातून विजयी झालेले ॲड.अजित विघ्ने यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सभापती व उपसभापती निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल, बागल गटाचे नेते दिविजय बागल, विलासराव घुमरे, प्रा.शिवाजीराव बंडगर, यांच्यासह पंचायत समिती सदस्य गण हिसरे भरत आवताडे, पंचायत समिती गण चिखलठाण वनमाला सरडे, वांगी पंचायत समिती गण सोनाली तकिक, कोर्टी पंचायत समिती गण नाना झाकणे, साडे गण दशरथ घाडगे, रावगाव पंचायत समिती गण संध्या कांबळे, उमरड पंचायत समिती गण आदिती पाटील, जेऊर पंचायत समिती गण ललिता शिरस्कर, पांडे गण स्वप्निल काळे, केम पंचायत समिती गण ज्ञानेश्वर बिचितकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप आदी मान्यवरांनीही सभापती व उपसभापतींचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नवनिर्वाचित सभापती पूजा ढेरे व उपसभापती ॲड.अजित विघ्ने यांनी तालुक्यातील विकासकामांना प्राधान्य देत सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

