करमाळा तालुका नागरी कृती समितीचे प्रशासनाला निवेदन; शहरातील विविध समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी -

करमाळा तालुका नागरी कृती समितीचे प्रशासनाला निवेदन; शहरातील विविध समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी

0

करमाळा ता. 21 : करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी करमाळा तालुका नागरी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या वतीने तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस स्टेशन, नगरपालिका प्रशासन तसेच एस. टी. डेपो व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.

समितीने दिलेल्या निवेदनात शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता व सार्वजनिक शिस्तीशी संबंधित अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. शहरातील जयप्रकाश नारायण टाऊन हॉल व त्यासमोरील पुतळ्याची दुरवस्था झाल्याने त्याची तात्काळ पुनर्निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने करमाळा शहरात आधुनिक व तंत्रशुद्ध पद्धतीने भूमिगत गटार योजना त्वरित कार्यान्वित करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

पुणे रोड ते जिल्हा परिषद विश्रामगृह ते दत्त मंदिर या मार्गावर मोठे खड्डे पडले असून, रस्त्यावरील रुंद दुभाजकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. संबंधित दुभाजक काढून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच देवीचा माळ ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या नव्याने बांधलेल्या रस्त्यावर दुभाजक व पथदिव्यांची व्यवस्था करावी, अन्यथा अपघातांची शक्यता वाढू शकते, असे समितीने स्पष्ट केले आहे. शुक्रवारचा आठवडी बाजार पुणे रोड व मंडई परिसरात भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे नवीन भाजी मंडईच्या ठिकाणी आठवडी बाजार भरवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सार्वजनिक समारंभ, लग्न, जयंती व सण-उत्सवांमध्ये कर्णकर्कश वाद्यांवर बंदी घालावी, तसेच करमाळा आगारातील प्रदूषण करणाऱ्या जुन्या एस. टी. बसेस बदलाव्यात, अशी मागणी समितीने केली आहे. एस. टी. स्टँड परिसर दररोज स्वच्छ ठेवावा, बसेसवर नामफलक स्पष्ट असावेत व वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी बसेस थांबवू नयेत, अशाही सूचना निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. या निवेदनाच्या वेळी प्रकाश लावंड, प्रा. नागेश माने, विवेक येवले, लक्ष्मण लष्कर, डॉ. जयंत कापडी, भारत वांगडे, शंकर कुलकर्णी, ॲड. सविता शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!