करमाळ्याला सर्व क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी करमाळा विधानसभेची निवडणूक लढवणार - Saptahik Sandesh

करमाळ्याला सर्व क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी करमाळा विधानसभेची निवडणूक लढवणार

केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्याला सामाजिक, वैद्यकीय, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी, तसेच शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी,युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी, वंचित घटकाला न्याय देण्यासाठी व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी जनतेच्या आग्रहाखातर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी वाशिंबे चौफुला येथील स्नेहमेळावा कार्यक्रमात व्यक्त केले.

वाशिंबे चौफुला येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक अंकुश झोळ हे होते. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गणेश मंगवडे, मराठा महासंघाचे सचिन काळे,सुहास काळे,मकाईचे माजी संचालक हरीभाऊ झिंजाडे ,राजुरीचे मा.सरपंच निवृत्ती भाऊ साखरे,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे ,वाशिंबे गावचे नेते भानुदास नाना टापरे,आबासाहेब मगर, वाशिंबेचे माजी सरपंच भगवानराव डोंबाळे,राजुरी चे सरपंच राजेंद्र भोसले,सोगाव चे सरपंच विनोद सरडे ,उंदरगावचे सरपंच युवराज मगर,आबासाहेब टापरे होते.

यावेळी करमाळा तालुक्यातील मकाई तसेच इतर साखर कारखान्याचे थकीत बिल शेतकऱ्यांना मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व त्यांच्यापत्नी सौ माया झोळ यांचा सत्कार शेतकरी संघटनेच्या तसेच शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविकात बोलताना प्रा. झोळ म्हणाले आपण जर विधानसभा निवडणूक लढा म्हणत असाल तर आपल्या आग्रहाखातर यावेळी विधानसभा निवडणुक लढविण्याची माझी तयारी आहे.याप्रसंगी उपस्थित वाशिंबे व पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी करून आम्ही आपणास पाठबळ देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक रामदास झोळ म्हणाले की राजकारण हे चांगल्या माणसांनी करण्याचे काम नाही असे म्हणून समाजातील चांगली सुसंस्कृत अभ्यासु माणसं राजकारणापासून अलिप्त राहिल्यामुळे ‌ त्या भागाचा विकास खुंटतो व परत तीच माणसे म्हणतात की चांगल्या माणसाने राजकारणात आले पाहिजे; परंतु बोलून दाखवण्यापेक्षा समाजाच्या कल्याणासाठी चांगल्या माणसांनी पुढे आले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने विकास होऊन समाजाचे कल्याण होईल याच भावनेतून आपण करमाळा तालुका विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित असल्याने या तालुक्याचे परिस्थिती पाहता आपला तालुका मागास राहिल्यामुळे या तालुक्याचे भवितव्य धोक्यात आहे राजकारणी मंडळी केवळ राजकारणापुरतं राजकारण करून आपला वैयक्तिक विकास करण्यात दंग आहेत. गटातटाचे राजकारण करून फक्त जनतेला विकासाचे नुसते खोटे चित्र दाखवून भुल पाडण्याचे काम केले जात आहे.

करमाळा तालुक्यामध्ये व्यवसायिक शिक्षणाची कुठलीही सोय नाही. इथे कुठलेही मोठे इंजीनियरिंग, मेकॅनिकल, वैद्यकीय शिक्षणाचे कुठलेही कॉलेज नाही. त्यामुळे येणाऱ्या युवा वर्गा समोर दहावी बारावी पदवीधर झाल्यानंतर रोजी रोटीसाठी परगावी जाण्याशिवाय पर्याय नाही. करमाळा तालुक्यात आरोग्य दृष्ट्या मागासपासून एवढा मोठा तालुका असताना तालुक्यातील एकही मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नाही ,आरोग्य सुविधाच्या अभाव मुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत .बाहेरगावी जावे लागत असल्याने आर्थिक हानी बरोबरच जीवित हानी होण्याचे शक्यता वाढते आहे . उजनी धरणामुळे येथील शेतकरी काही प्रमाणात उसामुळे सधन झाला असला तरी शेतकरी च्या ऊसाला एक तर सध्या परिस्थितीत राजकारण राजकीय हस्तक्षेपामुळे भाव मिळत नाही भाव मिळाला तर बिल लवकर मिळत नाही. अशी परिस्थिती इथल्या शेतकऱ्याची झाली असून शेतकऱ्याला वाली कोणी उरला नाही.

प्रा. रामदास झोळ

करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करमाळा तालुक्याचा भूमिपुत्र या नात्याने तालुक्यातील समस्या बघून या समस्या सोडवण्यासाठी आज आपण राजकीय भूमिका घेतली नाही तर आपला तालुका आणखी मागे जाईल आणि भविष्यामध्ये आपण करमाळा तालुक्यासाठी काही नाही केले याचा पश्चाताप होईल अशी भावना माझ्या मनात निर्माण झाल्याने मी करमाळा तालुक्यासाठी राजकीय भूमिका घेऊन काम करण्याची ठरवले आहे . सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे मत प्राध्यापक रामदास झोळ यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *