कात्रज जि.प. शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

करमाळा (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कात्रज येथे शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदमय आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी व सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थितांचे डोळ्यांचे पारणे फेडले.
स्नेहसंमेलनाच्या नियोजनासाठी करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, कोर्टी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले, जयवंत नलवडे तसेच जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख महावीर गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. जि. प. शाळा कोंढार चिंचोली येथील सहशिक्षिका बारवकर आणि खातगाव क्र. १ चे मुख्याध्यापक बोडखे यांनीही तांत्रिक व शैक्षणिक सहकार्य केले.

कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीधर लकडे, उपाध्यक्ष हरीभाऊ माने व सदस्यांचे सहकार्य लाभले. जिंती केंद्रातील नवले, गिरंजे, भोंग, देवकते, पाटील, गर्जे व सानप यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख महावीर गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच केतुर केंद्राचे केंद्रप्रमुख विकास काळे व हिंगणी शाळेचे मुख्याध्यापक देवकर यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका राणी झुंजरुक (जंगले) यांच्या प्रस्तावनेने झाली. सूत्रसंचालन तात्यासाहेब धायगुडे यांनी केले, तर आभार सुबोध हिवराळे यांनी मानले. शिक्षक प्रथमेश गोरे, सुबोध हिवराळे, अविनाश नेवसे आणि राणी झुंजरुक यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनामुळे कात्रज ग्रामस्थ व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. शाळेच्या या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

