कविटगावच्या “त्या” खड्ड्यामुळे वाहनांच्या लागत आहेत रांगा – वाहन चालकांची मोठी कसरत – तातडीने दुरुस्तीची मागणी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.6) : जातेगाव-टेंभुर्णी या राज्यमहामार्गावर सध्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे, कविटगाव (ता. करमाळा) येथे एका पुलाजवळ मोठा खड्डा पडल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या चार चाकी व दुचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे, या खड्ड्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत, त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची वाहन चालकांनी मागणी केली आहे.
जातेगाव-टेंभुर्णी या राज्यमहामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले आहे, या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले दिसत आहेत, खडी निघालेले दिसत आहे, त्यामुळे वाहनांचे अपघात होण्याची जास्त शक्यता निर्माण होत आहे, सध्या कविटगाव जवळील पुलावर मोठा खड्डा पडला असल्याने सर्व वाहनांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे, लहान वाहनांचे जवळपास अर्धे चाक त्या खड्ड्यात जात आहे, त्यामुळे लहान वाहन चालकांना गाडी कोठून न्यायाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे आपोआपच वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागून जवळपास तो खड्डा क्रॉस करण्यासाठी अर्धा ते एक तास वेळ जात आहे. या खराब व नादुरुस्त महामार्गामुळे शेकडो वाहनचालकांना व प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे सबंधित विभागाने या कविटगाव जवळच्या पुलावरील रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहनांना सुरळित रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांनी केली आहे.