चांडाळ चौकडीच्या करामतीमधील ‘बाळासाहेबांचे’ १८ एप्रिलला देवळालीला कीर्तन
करमाळा (सुरज हिरडे) : विनोदातून प्रबोधन करणारी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी वेबसेरीज चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधील बाळासाहेब या व्यक्तिरेखेची भूमिका निभावणारे कलाकार भरत शिंदे हे येत्या १८ एप्रिलला देवळाली (ता. करमाळा) येथे किर्तनसेवेसाठी येणार आहेत. ह.भ.प. भरत महाराज शिंदे यांचे या आधीदेखील करमाळा तालुक्यात केडगाव येथे ३१ मार्च रोजी कीर्तन सेवा झाली आहे.
देवळाली येथील ही कीर्तन सेवा १८ एप्रिलला सायंकाळी ८ ते १० या वेळेत देवळाली येथील नागनाथ महाराज मंदिराजवळ होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन देवळाली येथील राहुल कानगुडे व सुधीर आवटे मित्र परिवार यांनी शिवजयंती उत्सवा निमित्ताने केले आहे.
हा शिवजयंती उत्सव 17 एप्रिल ते 21 एप्रिल च्या दरम्यान होणार आहे यामध्ये 17 एप्रिल ला दहा ते पाच या वेळेत रक्तदान होणार आहे 18 एप्रिल रोजी सायंकाळी आठ ते दहा या वेळेत कीर्तन 19 एप्रिल रोजी सात ते दहा या वेळेत भव्य राज्यस्तरीय डान्स स्पर्धा 20 एप्रिल रोजी 7 ते 10 वेळेत शिवव्याख्यान होणार आहे 21 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता शिवमूर्ती पूजन होणार आहे तर सायंकाळी 6 वाजता मिरवणूक असणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे.
एकीकडे दारुड्याची भूमिका अन दुसरीकडे कीर्तनकार तिसरीकडे राजकारण/समाजकारण
सध्या वयाच्या चाळीशीत असलेले ह.भ.प. भरत महाराज शिंदे हे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रचे संस्थापक बंडातात्या कराडकर यांचे ते शिष्य आहेत. माळकरी असण्याची भरत शिंदे यांची ही त्यांच्या घराण्यातील तिसरी पिढी आहे. कलाकाराला कुठल्याही बंधनात बांधलं नाही पाहिजे. प्रत्येकाला एकच आयुष्य मिळते त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत असे मत भरत शिंदे यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले. शिंदे हे चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सेरीज मध्ये दारुड्या व्यक्तीची (बाळासाहेब) भूमिका निभावत आहेत. याविषयी ते म्हणाले की, लोक काय म्हणतील याचा जास्त विचार नाही करायचा. आपण कीर्तनकार आहोत म्हणून मी स्वतःला अभिनय क्षेत्रात काम करताना फक्त आदर्श वाटणाऱ्याच भूमिका केल्या पाहिजेत असे स्वतःला बांधू इच्छित नाही. जी कला आहे ती बाहेर काढली पाहिजे. माझ्याकडे दोन्ही कला दाखविण्याचे अंग आहे त्यामुळे मी ते सादर करतो.याचबरोबर भरत शिंदे यांच्या पत्नी दुर्गा भरत शिंदे या कांबळेश्वर ( ता.बारामती) या गावच्या सरपंच आहेत. या माध्यमातून ते गावाच्या राजकारणात व समाजकारणात सहभागी आहेत
पथनाट्य ते सिनेमा
भरत शिंदे (बाळासाहेब) हे अभिनय क्षेत्रात येण्याआधी शेती करत होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र सुभाष मदने व रामदास जगताप यांच्याबरोबर गेले २० ते २२ वर्ष विविध सामाजिक विषयांवर ५००० पेक्षा जास्त पथनाट्य सादर केलेली आहेत. त्यांना या मार्फत अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. यामार्फत त्यांना बाळूमामाच्या नावानं चांगभलं या टिव्ही सिरीयल मध्ये काम मिळाले. त्यानंतर ५ जानेवारी २०२० पासून तिघांनी मिळून युट्युबवर स्वतःची वेब सिरीज सुरू केली. आजपर्यंत या वेबसेरीजचे १७९ भाग प्रसिद्ध झाले असून १८ लाख लोक त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब आहेत. त्यांची प्रत्येक मालिका सुमारे १० लाखांच्या आसपास लोक पाहतात. या प्रसिद्धी च्या माध्यमातून त्यांना आता चित्रपटात काम करण्याची संधी मिळत आहे. भरत शिंदे उर्फ बाळासाहेब हे ‘रघु ३५०’ व ‘हैदराबाद कस्टडी’ अशा दोन सिनेमात ते दिसणार आहेत.