कोटलिंग देवस्थान यात्रेला सुरवात – तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा – हजारो भाविकांची गर्दी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण नं.१ (ता.करमाळा) येथील कोटलिंग देवस्थान यात्रेला सुरवात झाली असून, भाविकांच्या उपस्थितीत चांगभलं’च्या जयघोषात गुलालाची उधळण करत आंबिल पौर्णिमा उत्सवाने कोटलिंग- जोगेश्वरी विवाह सोहळा संपन्न होऊन देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
या यात्रेसाठी सोलापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात, सोलापूर, सातारा, धाराशिव, पुणे व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटलिंग देवाची यात्रा ही करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोटलिंग- जोगेश्वरी विवाह सोहळ्याने या यात्रा उत्सवाला सुरवात होते. मुख्य यात्रा सात दिवसांनंतर चैत्र कृष्ण अष्टमीला म्हणजे १३ एप्रिल रोजी छबिना मिरवणुकीने संपन्न होणार आहे.
सर्वधर्म समभावाचे प्रतिक असणाऱ्या या यात्रेत विविध जाती जमातीच्या समाजातील लोकांना मान असतो. गावातील परीट समाजातील प्रतिनिधीच्या हस्ते देवाला तेल लागते. आंबिल पौर्णिमा दिवशी या देवाच्या मानाच्या कावडी बसवल्या जातात. देवाला तेल लागल्याच्या कालावधीत गावातील लोकांकडून तेलवान कडकपणे पाळले जाते. यामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद असतो. देवाचे भक्त या कालावधीत उपवास धरतात.
पोर्णिमेच्या आंबिल आरतीनंतर ढोल, लेझीमचा ठेका धरत देवाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली, यानंतर आंबिल पिऊन भाविकांनी उपवास सोडला. बारा बलुतेदार संघटनेच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, या मिरवणुकीत सर्व जाती समाजातील लोक सहभागी झाले होते. देवाला तेल लागल्यापासून यात्रा पूर्ण होईपर्यंत ससा मासा, देवपारध, देव शिकारीसाठी जाणे हे विधी असतात. या कालावधीत शेतीची मशागतीची कामे करणे, दाढी करणे, केस कापणे, गादीवर झोपणे बंद असते. चैत्र कृष्ण अष्टमीला छबिना मिरवणूक काढण्यात येते. यामध्ये मुक्त हस्ताने गुलालाची उधळण करत हजारो भाविक सहभागी होतात. या दिवशी देवाच्या मानाच्या कावडी देवाला धार घालतात. सध्या या यात्रेसाठी हजारो भाविक कोटलिंग देवस्थान मंदिर परिसरात गर्दी करत आहेत.