शाश्वत आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धतीचा अवलंब केल्याबद्दल केम येथील तळेकर दांपत्याचा गौरव

केम(संजय जाधव): रोटरी शास्वत शेती गौरव पुरस्काराने केम येथील प्रगतशील शेतकरी दांपत्य सिमा जालिंदर तळेकर आणि जालिंदर तळेकर यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

तळेकर दांपत्याने शाश्वत पद्धतीने शेती करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी १२ एकर द्राक्ष बाग, १५ एकर सिताफळ आणि १० एकर कांदा पीक घेतले असून शंभर टक्के शेती ठिबक सिंचन पद्धतीने केली आहे. सेंद्रिय शेतीवर भर देत त्यांनी गांडूळ खत, स्लरी फिल्टर व माती परीक्षणानुसार खतांचा वापर केला आहे. शंभर फूट उंचावरील पठारावर शेततळे तयार करून लाईटशिवाय सिंचनाची व्यवस्था केली आहे.

या प्रयत्नांची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी, पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष भरत चव्हाण, माजी अध्यक्ष जयप्रकाश जाधव उपस्थित होते. तळेकर दांपत्याच्या या यशाबद्दल केम व परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.


