कुकडी कालवा भूसंपादनाचा मोबदला तातडीने द्या – शेतकरी संतप्त – कालवा बुजवण्याच्या तयारीत..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात २६ किलोमीटर अंतरावर कुकडीचे कॅनॉल तयार झाले असून, अद्याप या कॅनॉलमधून पाणी आले नाही आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना भुसंपादनाचा मोबादलाही मिळाला नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून, पाटबंधारे विभागाने भुसंपादनाची रक्कम सर्व शेतकऱ्यांना तातडीने द्यावी अन्यथा संबंधित शेतकरी ज्याच्या त्यांच्या हद्दीतील कालवे बुजविण्याच्या तयारीत आहेत.
करमाळा तालुक्यातील २४ हजार ५६२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी कुकडी डावा कालवा २२३ किलोमीटर ते २४९ किलोमीटर पर्यंत करमाळा तालुक्यात खोदण्यात आला आहे. असे असलेतरी या खोदलेल्या तलावातून एकदाही पाणी आले नाही, आणि भविष्यात पाणी येण्याची शाश्वती एकाही शेतकऱ्याला राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
काही शेतकऱ्यांना भुसंपादनाची रक्कम मिळालेली आहे. ५० टक्के पेक्षा जास्त शेतकरी पैशाच्या प्रतिक्षेत आहेत. पाटबंधारे विभाग व भुसंपादन कार्यालय यांच्यातील असमन्वय आणि शासनाकडील पैशाची कमतरता यामुळे भुसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या हद्दीतील कॅनॉल जेसीबीद्वारे बुजवून काही ठिकाणी शेती केली आहे, काही ठिकाणी घरे बांधले आहेत. काही ठिकाणी गोठा केलेला आहे. रस्त्यालगतच्या कॅनॉलवर कॅनॉल बुजवून धाबे टाकलेले आहेत.
हे प्रमाण आता वाढत असून भुसंपादन कार्यालयाने सर्व संपादीत झालेल्या शेतकऱ्यांचा मोबदला तातडीने देण्याची गरज आहे. अन्यथा राहिलेले कॅनॉलही जमिनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत; असा इशारा संबंधित शेतकऱ्याच्या प्रतिनिधींनी दिला आहे.
अंजनडोह, विहाळ, उमरड, राजुरी, पुनवर, जातेगाव, कामोणे, पोथरे, मांगी, वडगाव, लिंबेवाडी, सावडी, कुरणवाडी, पोंधवडी, मांजरगाव, हुलगेवाडी, गोरेवाडी, कोर्टी, मोरवड, रोशेवाडी, जेऊरवाडी, वाशिंबे, पोफळज, वंजारवाडी, घरतवाडी, भिलारवाडी, कावळवाडी, भगतवाडी, गुलमोहरवाडी, हिंगणी, देलवडी, दिवेगव्हाण, पारेवाडी, कुंभारगाव, वीट, झरे, खडकेवाडी, कुंभेज, रावगाव, पिंपळवाडी, भोसे, हिवरवाडी, करमाळा ग्रामीण, उंदरगाव, सोगाव अशा गावातून २६ किलोमीटरचा कॅनॉल झाला आहे. प्रत्येक गावातून कमी-अधिक क्षेत्र संपादीत झाले आहे. संपादनाचा मोबदला तात्काळ द्यावा ही शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे.