जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी पुढाकार – सुजित बागल यांची उल्लेखनीय घोषणा

करमाळा (दि. १६): मांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ चिमुकल्यांच्या जल्लोषात आणि विशेष उपक्रमांच्या साक्षीने झाला. नव्याने पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, मिठाई व खेळणी देऊन खास स्वागत करण्यात आले.


यावेळी आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व करमाळा तालुका वाचनालय संघटनेचे अध्यक्ष सुजित बागल यांनी “मांगी जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची पूर्ण एक वर्षाची घरपट्टी मी स्वतः भरणार” असल्याचे जाहीर करत सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श पुढे ठेवला.

यामागची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, “जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्याच कमी होत असल्याने काही ठिकाणी शाळांचे वर्गच बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीत सरकारी शिक्षण व्यवस्थेला बळ देण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. छोटे प्रयत्न मोठा बदल घडवू शकतात.”

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कवळे गुरुजी, शिक्षिका सौ. सुवर्णा महामुनी, सौ. पवार मॅडम, सौ. देमुंडे मॅडम, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे उमेश बागल, निखिल बागल, पोलीस पाटील आकाश शिंदे, किशोर बागल, शिवाजी राऊत आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
सुजित बागल यांच्या या सामाजिक निर्णयाचे ग्रामस्थांसह पालकांकडून कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे जिल्हा परिषद शाळांना नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.





