माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन - 19 ऑगस्टला रामदास कोकरे यांचे व्याख्यान.. - Saptahik Sandesh

माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन – 19 ऑगस्टला रामदास कोकरे यांचे व्याख्यान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन केले असून, ही व्याख्यानमाला जेऊर (ता.करमाळा) येथील भारत महाविद्यालयाच्यावतीने समाजप्रबोधनाच्या हेतूने आयोजित केल्या जाणाऱ्या व्याख्यानमालेचे यंदा हे बारावे वर्ष असून या व्याख्यानमालेच्या तपपुर्तीच्या निमित्ताने ‘घनकचरा व्यवस्थापनातील महाराष्ट्राचे आयडॉल’ लातूरचे सहआयुक्त रामदास कोकरे व जेष्ठ समाजसेवक, महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आल्याची माहिती व्याख्यानमालेचे प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी दिली.

भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार लोकनेते नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या बारा वर्षापासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेत आजवर महाराष्ट्रातील विविध विभागातील नामवंत वक्त्यांनी व्याख्याने दिली आहेत. समाजातील संवेदनशील आणि समाज परिवर्तनासाठी अत्यंत गरजेच्या विषयावर विविधांगी व्याख्यानांचे आयोजन करून कर्मयोगी व्याख्यानमालेने आपली पुरोगामी प्रबोधन परंपरा यंदाही कायम राखली आहे. यावर्षी शनिवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता ” स्वप्न: कचरा मुक्त गावाचे ” या विषयावर रामदास कोकरे यांचे व्याख्यान पावरपॉइंट प्रेझेंटेशनसह होणार असून याप्रसंगी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते ॲड.डॉ.बाबुराव हिरडे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

तसेच मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता ” विधवा प्रथा निर्मूलन : काळाची गरज ” या विषयावर विधवाप्रथा निर्मूलनासाठी भरीव योगदान देणारे करमाळ्याचे सुपुत्र, ज्यांना नुकताच अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनच्यावतीने विशेष सामाजिक कार्याबद्दल दिल्या जाणा-या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे. याप्रसंगी कंदर येथील प्रगतशील बागायतदार कृषीभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी दादासाहेब पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. भारत महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणारी उपरोक्त दोन्ही व्याख्याने अत्यंत महत्त्वाची आणि समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत मौलिक स्वरूपाची असून या दोन्ही व्याख्यानांसाठी सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व जेऊर पंचक्रोशीतील महिलावर्गासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!