जेऊर येथे 22 ऑगस्ट व 23 ऑगस्ट रोजी ‘कर्मयोगी व्याख्यानमाला’ – न्यायमूर्ती कोळसे-पाटील व पत्रकार संजय आवटे यांची व्याख्याने..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेली 14 वर्षे जेऊर (ता.करमाळा) येथील भारत महाविद्यालयाच्यावतीने आयोजित केली जाणारी कर्मयोगी व्याख्यानमाला आज 22 ऑगस्ट व 23 ऑगस्ट या दोन दिवशी संपन्न होत आहे.
या व्याख्यानमालेमध्ये गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता प्रख्यात वक्ते व दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे ‘ महाराष्ट्राचा नाद नाय करायचा ‘ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता थोर विचारवंत व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांचे ‘भारतीय संविधान व आजचे वास्तव’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे.
23 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानास व माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसाच्या समारंभास माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील हे महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे युवानेते उपस्थित राहणार आहेत. शिव-शाहू, फुले- आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेला पुढे घेऊन जाणाऱ्या व परिवर्तनवादी विचारांना बळ देणाऱ्या या व्याख्यानमालेतील दोन्ही व्याख्यानांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या व्याख्यानमालेचे प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी व भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी केले आहे.