ओमीनी कार मधून ९४ हजाराची दारू जप्त..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ओमीनी कारमधून बेकायदेशीरपणे देशी दारूची वाहतूक करताना पोलीसांनी ९४ हजार ८० रूपयाचा माल तसेच ७० हजाराची सुझुकी कंपनीची ओमीनी जप्त करण्यात आली आहे.
हा प्रकार १३ मार्च ला पावणेचार वाजता मौलाली माळावर घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजय पांडूरंग वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांच्या माध्यमातून मी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने, पोलीस निरीक्षक पारेकर, हवालदार प्रकाश कारटकर, हवालदार रवी माने, कॉन्स्टेबल सुरज रामगुडे असे आम्ही सर्वजण करमाळा पोलीस ठाणे हद्दीत असताना मारूती सुझुकी कंपनीच्या ओमीनी कार मधून बेकायदेशीर देशी दारू वाहतूक होत असल्याचे समजले.
त्यावेळी आम्ही १३ मार्चला दुपारी पावणेचारच्या सुमारास मौलाली माळावर असताना सदरची कार आली होती. ती कार आडवली असता त्या कारमध्ये देशी संत्रा कंपनीच्या ४८ बाटल्या असल्याचे एकूण २५ बॉक्स त्याची किंमत ८४ हजार रू. तसेच टँगो सुपर कंपनीचे १० हजार ८० रू. किंमतीचे तीन बॉक्स सापडले आहे. याशिवाय अंदाजे ७० हजार रू. किंमतीची ओमीनी कार जप्त करण्यात आली आहे. ही दारू तानाजी शिवाजी सरक (वय २१, रा. लव्हे) याच्याकडे सापडली आहे. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.