साहित्यिका प्रतिभा बोबे व सारिका बोबे यांना ‘हिरकणी राज्यस्तरीय साहित्यसाधना पुरस्कार’..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील कर्मवीर कै.आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक नारायण गणपत बोबे यांच्या कन्या व साहित्यिका प्रतिभा नारायण बोबे (राहुरी) व सारिका नारायण बोबे (बार्शी) यांना मानाचा ‘हिरकणी राज्यस्तरीय साहित्यसाधना पुरस्कार’ मिळाला तसेच ‘बहाई अकादमी पाचगणी’ (ता.महाबळेश्वर) यांच्यावतीने आयोजित ‘इंडियन बुक आॕफ रेकाॕर्ड’ मध्ये त्यांच्या काव्यसंग्रहाची नोंद झाली.
हिरकणी साहित्यसाधना पुरस्काराचा नावीन्यपूर्ण सोहळा नुकताच पाचगणी येथे दि.३ डिसेंबर २०२२ रोजी पार पडला.याठिकाणी त्यांच्या अनुक्रमे ‘आम्ही वाद्यवृंद ‘ व ‘लेखणीची देणगी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले तसेच या दोघींना ‘इंडियन बुक आॕफ रेकाॕर्डचे मानपत्र,मेडल,ट्राॕफी देऊन गौरविण्यात आले.
श्रीम.वनमाला यादवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन रेकाॕर्ड्ससाठी विविध विषयांवर अष्टाक्षरीतच ३६ विषयांवरील ३६ पुस्तकांत एकूण १२९६ रचना रचल्या गेल्या व या ३६ पुस्तकासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक अशा ३६ संपादिका बनल्या.अशा या राष्ट्रीय विक्रमात अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याचा सहभाग यांनी नोंदवला.
याप्रसंगी हिरकणी समुहाच्या सर्वेसर्वा वनमालाताई पाटील,डाॕ.सुनिल पाटील,बहाई अकादमीचे लेसन अझीज,डाॕ.राधा रोस्ट,डाॕ.विद्या ठक्कर यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार या दोघींनीही वडिल नारायण बोबे व आई सौ.विद्या बोबे यांना समर्पित केला आहे.