प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांना ‘सर फाउंडेशन’चा नॅशनल एज्युकेशनल इनोवेशन अवॉर्ड प्रदान

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र नागरे यांना सर फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा नॅशनल एज्युकेशनल इनोवेशन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसेवक व पद्मश्री पुरस्कार विजेते गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.ह.ना.जगताप, प्रिसिजन फाउंडेशनच्या सर्वेसर्वा डॉ.सुहासिनी शहा यांच्या शुभहस्ते प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सर फाउंडेशन सोलापूर आयोजित नॅशनल एज्युकेशनल इनोवेशन कॉन्फरन्स दि. 4 व 5 मार्च 2023 रोजी सोलापूर या ठिकाणी आयोजित केलेली होती. यामध्ये गुजरात, छत्तीसगड,कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ व संपूर्ण महाराष्ट्रातून विविध नवोपक्रमशील शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
यामध्ये प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांनी श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केमची यशोगाथा – शैक्षणिक उपक्रमातून खेड्यातील मुलांचा व्यक्तिमत्व विकास हा नवोपक्रम सादर केला होता. या नवोपक्रमामध्ये त्यांनी श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये राबविलेले वेगवेगळे नवोपक्रम, त्यातून विद्यार्थ्यांचा झालेला व्यक्तिमत्व विकास व त्यातून या ज्युनिअर कॉलेजची वाढलेली गुणवत्ता व विद्यार्थी संख्या यांचा आढावा घेतला होता.
या दैदिप्यमान यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य श्री अभयकुमारजी साळुंखे, कार्यकुशल सचिवा प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ मा.श्री.कौस्तुभ गावडे, प्राचार्य श्री सुभाष कदम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर, सर्व गुरुदेव कार्यकर्ते, केम परिसरातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.