अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे – माजी आमदार संजयमामा शिंदे

करमाळा: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन हा अनपेक्षित धक्का आहे.महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान त्यामुळे झालेले आहे अशी भावना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मी निमगाव गावचा सरपंच असताना अजितदादांचा पहिला सत्कार केला होता. त्यानंतर त्यांच्याशी माझे वैयक्तिक व भावनिक नाते जडले. रात्री-अपरात्री कधीही मी दादांशी हक्काने बोलत असे. कोणतीही अडचण मांडली की ते निश्चितच त्यातून मार्ग काढत. राजकारणापेक्षा त्यांच्याशी माझे भावनिक नाते अधिक घट्ट झाले होते. त्यामुळेच मी त्यांना माझा नेता मानत होतो.

अजितदादा हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. सकाळी सहा वाजल्यापासून ते कामाला सुरुवात करत असत. त्यांच्या निधनाने राज्याचे व जिल्ह्याचे तर नुकसान झालेच आहे, मात्र करमाळा तालुक्याचे नुकसान अधिक मोठे आहे. करमाळा मतदारसंघासाठी त्यांनी एका पंचवार्षिक योजनेत सुमारे ३५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला.

यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सीना नदीकाठच्या भागाची पाहणी करण्यासाठी ते करमाळ्यात आले होते. नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटल्याने त्या ठिकाणी मोठा पूल उभारण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या व तात्काळ नियोजन करण्याचे आदेश दिले. अशा कर्तृत्ववान, कार्यतत्पर आणि लोकाभिमुख नेतृत्वाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.

