जलसंधारणाच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या कंपनीची चौकशी व्हावी – महेश चिवटे
करमाळा (दि.१२) – करमाळा तालुक्यातील जलसंधारणाच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असून काम न करता बिल उचलण्याचे प्रकार उघड झाले असून या प्रकरणातील संबंधित अधिकारी व शिवनेरी कंट्रक्शन कंपनी यांची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना श्री.चिवटे म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासून करमाळा तालुक्यात कोट्यावधी रुपयाची जलसंधारणाची कामे सुरू आहेत. काम करते कोण त्याचा तपास जनतेला लागत नाही, कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचे नाव कामाचे अंदाजपत्रक व कामाचे स्वरूप इतर माहिती लावली जात नाही. जलसंधारण खात्याचे अधिकारी केवळ शिवनेरी कन्स्ट्रक्शन कंपनीलाच ही कामे देऊन भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत.
पोथरे जातेगाव नेरले या तलाव दुरुस्तीच्या कामात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. संबंधित कामाबद्दल तक्रार करणाऱ्याला आर्थिक तोड पाणी करून त्याचे तोंड गप्प केले जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता उडवा उडवीची उत्तरे दिले जातात. आज केवळ करमाळा तालुक्यात जलसंधारणाची 30 ते 40 कोटी रुपयांची कामे सुरू असून ठराविक ठेकेदार व अधिकारी यांची संगम मतामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.
तलावातील पाण्याचा साठा वर्षभर कायमस्वरूपी राहून शेतकऱ्याचा फायदा व्हावा या हेतूने तलाव मजबुती करण्याचे काम शासन करते. मात्र हे तलाव मजबुतीकरण करण्याचे काम म्हणजे ठेकेदारांना फुकटचे घबाड मिळण्याचे ठिकाण झाले आहे. तलावातून काढलेला मुरूम सुद्धा रस्त्याच्या कामाला वापरत शासनाची रॉयल्टी चुकवून संबंधित ठेकेदार कोट्यावधी रुपये मिळवत आहेत.
13 सप्टेंबर रोजी अजून करमाळा तालुक्यातील 13 कोटी रुपयांची कामे टेंडर ओपन केली जाणार असून ही कामे सुद्धा शिवनेरी कंट्रक्शन कंपनीला देण्याचा प्रयत्न मलिदा लाटण्याचा काम अधिकारी करणार आहेत यामुळे उद्याची टेंडर प्रक्रिया थांबवावी अशी मागणी ही जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.