युवा शेतकऱ्यांना सोबत घेत ४१ हजार टन ऊस वाहतुक केल्याबद्दल पांगरे ग्रामस्थांकडून टेकाळे यांचा सत्कार -

युवा शेतकऱ्यांना सोबत घेत ४१ हजार टन ऊस वाहतुक केल्याबद्दल पांगरे ग्रामस्थांकडून टेकाळे यांचा सत्कार

0

करमाळा :पांगरे गावचे सुपुत्र व उपसरपंच पैलवान महेश टेकाळे आणि त्यांच्या समूहातील सर्व ट्रॅक्टर वाहनमालकांनी मजुरांच्या साहाय्याने तब्बल ४१ हजार टन ऊसतोड करून विविध कारखान्यास गाळपासाठी वाहतूक केल्याबद्दल त्यांचा सन्मान पांगरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. हा सन्मान प्रहार धरणग्रस्त संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष तसेच पांगरे गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय सोनवणे, ज्येष्ठ नागरिक मुगाजीराव येवले, भाऊसाहेब मकाई सहकारी साखर कारखानाचे संचालक सचिन बापू पिसाळ, पांगरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब गुटाळ, माजी उपसरपंच गणेश वडणे व विवेक पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनंजय गायकवाड, ग्रामविकास अधिकारी कांबळे, बालाजी दौंड, युवा उद्योजक अरुण शेंडगे, प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी सुशांत वडणे तसेच शिवन्या वीट उद्योग समूहाचे मालक नाथ बाबा काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना उपसरपंच पैलवान महेश टेकाळे म्हणाले की, पुढील काळातही पांगरे व परिसरातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडीअडचणी असोत—ऊसतोड असो वा कारखान्याकडील बिले मिळण्याचा प्रश्न—त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. गोरगरीब शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

युवा शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता, शेतीशी निगडित जोडधंदे उभे करावेत या विचाराने महेश टेकाळे यांनी परिसरातील १४ तरुण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ऊस वाहतूक व्यवसायाचा सविस्तर आराखडा तयार केला. या उपक्रमांतर्गत तरुणांना १० नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. स्वतःच्या दोन ट्रॅक्टरसह एकूण १५ ट्रॅक्टरचा सक्षम ताफा उभा राहिला.
या ताफ्याच्या माध्यमातून चार नामांकित साखर कारखान्यांशी थेट करार करण्यात आला. सुमारे ३५० मजुरांचे नियोजन करून ऊसतोड करण्यात आली. चालू गळीत हंगामात जेऊर परिसरातून या १५ ट्रॅक्टरच्या साहाय्याने तब्बल ४१ हजार टन उसाची विक्रमी वाहतूक यशस्वीपणे करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!