मकाई कारखाना – भिलारवाडी, पारेवाडी व मांगी गटातून निवडणूक होणार – अन्य 8 जागा बिनविरोध..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचे दोनच अर्ज मागे घेतल्याने भिलारवाडी, पारेवाडी व मांगी गटातून निवडणूक होणार असून अन्य ८ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
मागील निवडणूकित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ८ उमेदवारासाठी निवडणूक झाली होती, तर यावर्षी ५ उमेदवारांसाठी निवडणूक होत आहे. मांगी गटातून २ जागेसाठी ३ उमेदवार उभे आहेत, पारेवाडी येथे ३ जागेसाठी ४ उमेदवार तसेच भिलारवाडी गटात २ उमेदवार लढत आहेत. महिला मतदारसंघातुन २ जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात सुनीता गिरंजे या महिला मतदारसंघातून व भिलारवाडी गटातून निवडणूक लढवित आहेत.
यासाठी शुक्रवारी (ता.१६) मतदान होणार आहे. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे व नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली झाली. पोलिस उपनिरीक्षक मिटू जगदाळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
भिलारवाडी : या गटामध्ये दोन जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यासाठी चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अजित झंजुर्णे व रामचंद्र हाके हे बागल गटाचे उमेदवार असून त्यांच्याविरुद्ध सुनीता गिरंजे व अप्पासाहेब जाधव हे उमेदवार असणार आहेत. पारेवाडी गटात तीन जागा निवडून द्यायच्या असून येथे बागल गटाचे बाळासाहेब पांढरे, रेवणनाथ निकत व संतोष पाटील हे उमेदवार आहेत. त्याच्याविरुद्ध गणेश चौधरी हे असणार आहेत. महिला राखीवमध्ये बागल गटाच्या कोमल करगळ व अश्विनी झोळ हे उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध सुनीता गिरंजे या उमेदवार आहेत. या दोन जागांसाठी बिनविरोध झालेल्या चिखलठाण आणि वांगी या गटातही मतदान होणार आहे. यातील एक जागा बागल गटाची येणार आहे. बिनविरोध झालेल्या गटात कसे मतदान असणार इतर उमेदवारांन मतदान असणार का फक्त राखीव उमेदवारांना मतदान असणार याबाबत मात्र संभ्रम असून स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.
चिखलठाण गटातील सतीश नीळ व दिनकर सरडे. वांगी गटातील युवराज रोकडे व सचिन पिसाळ. सहकारी संस्था मतदार संघातील नवनाथ बागल. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मतदार संघातील आशिष गायकवाड व अनिल अनारसे. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी गटातील बापू चोरमले हे बिनविरोध झाले आहेत.

