मकाई कारखाना थकित ऊस बिलासंदर्भात ‘थुंकुन निषेध’ – 25 डिसेंबर पर्यंत तात्पुरते आंदोलन स्थगीत..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.11) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील थकीत ऊस बिलासाठी बोंबाबोंब आंदोलन झाल्यानंतर पुन्हा तत्कालीन व विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम केंद्रीय ऊस नियंत्रण आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करून घ्या आणि त्यांच्या खाजगी मालमत्ता वर बोजा चढवण्या संदर्भात थू-थू आंदोलन करण्यात आले.
यावेळी तत्कालीन कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांचा चेहरा पुतळ्याला तसेच गाढवाला लावून मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान मा.जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्याकडे एक बैठक घेतल्यानंतर आंदोलन कर्ते ॲड.राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा.रामदास झोळ, रवींद्र गोडगे यांचे शिष्टमंडळ यांना जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी 25 डिसेंबर पर्यंत थकीत ऊस बीलाची रक्कम देऊ असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आंदोलनकर्ते ॲड.राहुल सावंत यांनी दिली. त्यानंतर हे आंदोलन तात्पुरते 25 डिसेंबरपर्यंत रोखण्यात आले आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिलासाठी वारंवार करमाळा येथे आंदोलन झाले, कारखाना आणि प्रशासन यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व सभासदांची फसवणूक केली आहे. असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. बारा महिने होऊनही अद्यापपर्यंत थकीत ऊस बीलाची रक्कम दिलेली नाही. वारंवार मागणी करूनही, आंदोलन होत असतानाही त्याचे गांभीर्य घेत नसल्यामुळे आंदोलनकर्ते शेतकरी आक्रमक झाले आहेत.
8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात भजनी मंडळ, बैलं, गाढवं, कोंबड्या व विविध घोषणा यांचा समावेश केलेला होता. यावेळी थकीत ऊस बिलाची रक्कम पंधरा टक्के व्याजासहित मिळावी अन्यथा जोपर्यंत सदरचा बोजा व फौजदारी गुन्हे दाखल होत नाही, तो पर्यंत न उठण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांच्या वतीने घेण्यात आली. तर घटनास्थळी सकाळ पासून भजन कीर्तन टाळकरी व वारकरी भक्तिमय वातावरणात भजन कीर्तन चालू होते. अखेर जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
दरम्यान सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून मकाई कार्यकारी संचालक व अध्यक्ष यांच्यासह आंदोलनकर्ते यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. या बैठकीत चर्चा करण्यासाठी ॲड.राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ, रवींद्र गोडगे आदींसह काही शेतकरी सोलापूर येथे हजर होते. त्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या सोबत बैठक केली. यावेळी कार्यकारी संचालक श्री. खाटमोडे या बैठकीत गैरहजर होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांना संपूर्ण वस्तुस्थिती सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी करमाळा प्रभारी तहसीलदार श्री.जाधव यांच्या मोबाईल वरून कार्यकारी संचालक श्री.खाटमोडे यांना फोन केला आणि आज (ता.११) रोजी सकाळी अकरा वाजता माजी चेअरमन दिग्विजय बागल व विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर यांना मिटींगला उपस्थित राहण्याचे सक्तीचे आदेश दिले. अन्यथा कारवाई करू असाही इशारा दिला.
यावेळी आंदोलनकर्ते यांना जिल्हाधिकारी यांनी 25 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना थकीत ऊस बिल बीलाची रक्कम देऊ अन्यथा कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले असल्याची माहिती ॲड .राहुल सावंत यांनी दिली. या आश्वासनानंतर श्री.सावंत यांनी करमाळा येथे बसलेल्या आंदोलनकर्त्यांना उठण्याचा सल्ला दिला.
यावेळी करमाळा येथे ठिय्या आंदोलनसाठी हरिदास मोरे, मोहन पडवळे, ज्ञानेश्वर कावळे, सिद्धेश्वर कावळे, काकासाहेब गपाट, अविनाश पाटील, बाबु वाळुंजकर, पप्पू वाळुंजकर, सुंदरदास काळे, पंढरीनाथ पाटील, संतोष मोरे, दादा जाधव, प्रकाश पवार, राजेंद्र पाटील, शहाजी माने, दादा साबळे , नीतीन सरडे, कांतीलाल पाटील, आबा सरडे, नितीन सरडे, नामदेव सरडे, उमेश सरडे, प्रशांत पोळके, नवनाथ भांडवलकर, रामदास मोरे, बाळासाहेब रोडे, बापू पुणेकर आदी शेतकरी उपस्थित होते.