एकीचे बळ – पोफळजकरांनी लोकवर्गणीतून उभारले मंगल कार्यालय
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – गाव एकत्र आल्यानंतर लोकसहभागातून लोकांच्या हिताचे काम कसे होऊ शकते याचा आदर्श पोफळजकरांनी दाखवून दिला आहे. ग्रामस्थांना वर्षभरातील विविध कार्यक्रमासाठी लागणारे मंगल कार्यालय पोफळज ग्रामस्थांनी लोकसहभागातून बांधले असून आज (दि.१५) मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर ते खुले केले आहे.
पोफळज गावात दरवर्षी आषाढी कार्तिकी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या मुक्कामी येत असतात. या दिंड्यांची कायमस्वरूपी सोय व्हावी याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली. यातूनच वर्षभरातील विविध कार्यक्रमांना लागणारे प्रशस्त हॉल असावा हा विचार ठेवून ग्रामस्थांनी लोकसहभागातून मंगल कार्यालय बांधण्याचे ठरवले. या कार्यासाठी ग्रामस्थांनी ५ हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंत वर्गणी दिली आहे. आतापर्यंत लोकवर्गणीतून ११ लाख ९ हजार ९२८ रुपये जमा झाले आहेत व अजून १२-१३ लाख वर्गणीतून येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या जमा झालेल्या वर्गणी मधून विठ्ठल रुक्मिणी व मारुती मंदिराच्या दोन्ही जागेच्या मधोमध 130 फूट लांब 50 फूट रुंद असे भव्य, प्रशस्त असे छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय बांधून तयार झाले असून आज (दि.१५) मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर ते खुले केले आहे.
हे मंगल कार्यालय पोफळज गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना परवानगी घेऊन मोफत वापरण्यास खुले केले आहे. यामध्ये गावात येणाऱ्या दिंड्या, किर्तन सोहळा, लग्न समारंभ, भंडारा, सप्ताह, शिवजयंती, गणेशोत्सव, तसेच राम नवमी, कृष्ण जन्माष्टमी, तुकाराम बीज आदी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम यासाठी खुले असणार आहे. या मंगल कार्यालयामुळे गावातील लग्न समारंभासह इतर कार्यक्रमाला लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. यामुळे ग्रामस्थांकडून या कार्याचे कौतुक केले जात आहे.
लोकसहभागातून अजून १२-१३ लाख वर्गणी येणार असून यातून अन्नछत्रालय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा, धर्मवीर संभाजीराजे जिम्नेशियम आदी कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.