मांगी तलाव १०० टक्के भरला – शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
करमाळा (दि.१७) – कुकडी प्रकल्पातील ओव्हर फ्लोच्या पाण्याने अखेर मांगी (ता. करमाळा) तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडवा वाहू लागला आहे. त्यामुळे तलाव लाभ क्षेत्रातील मांगी, वडगाव, पोथरे, निलज यांसह तालुक्यातील उत्तर भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा तलाव मागच्या वेळी सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता.
मांगी तलाव हा ब्रिटिश कालीन तलाव असुन तो कान्होळा नदीवरील तलाव आहे. या तलावाची एकूण क्षमता एक टीएमसी असून यावर साडेचार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. कुकडी प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यासाठी राखीव असून सुद्धा मृगजळा सारखे ठरत आले आहे. यावर्षी जूनपासून पुणे जिल्ह्यात सतत जोरदार पाऊस झाल्याने कुकडी धरण लवकरच भरले व कुकडी धरणाखालील सर्व प्रकल्प देखील भरले. त्यामुळे ओव्हर फ्लोच्या पाण्याने मांगी तलाव भरून घ्यावा अशी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी होती.
त्यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळ अधीक्षक अभियंता यांच्याकडे कुकडी ओव्हरफ्लो चे पाणी मांगी तलावात सोडण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर जिल्हा नियोजन समिती सदस्य दिग्विजय बागल यांनी देखील जिल्हाधिकारी यांना कुकडी कॉम्प्लेक्समधील धरणाच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यामधून करमाळा तालुक्यातील मांगी, वीट, कुंभारगाव, पिंपळवाडी, पोंधवडी, कोर्टी या व इतर तलावामध्ये पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी दिग्विजय बागल यांच्या मागणी पत्राचा संदर्भ देत कुकडी पाटबंधारे मंडळा कडे तलाव भरण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. अखेर तलावात पाणी आल्याने बळीराजा सुखावला आहे.
गतवर्षी दुष्काळामुळे मांगी आणि पंचक्रोशी यांना फटका बसलेला होता. याची दखल घेऊन आ.संजयमामा शिंदे यांनी यावर्षी कुकडी प्रकल्पामध्ये चांगले पर्जन्यमान होत असताना 26 जुलै 2024 रोजी अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळ यांच्याकडे ओव्हरफ्लो चे पाणी मांगी तलावात सोडण्याची मागणी सर्वप्रथम केली आणि त्यानुसार जुलैमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे 16 सप्टेंबर 2024 अखेर मांगी तलाव ओहर फ्लो होत आहे. आमदार संजयमामा शिंदे यांचे हे ऋण मांगी गावासह या तलावाच्या पाण्याच्या उजव्या आणि डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील जनता कधीही विसरणार नाही.
– सुजित बागल, सदस्य, ग्रामपंचायत मांगी
मांगी तलावामधून मांगी, पोथरे, बिटरगाव श्री, निलज, करंजे, खांबेवाडी, अर्जुननगर, मिरगव्हाण, बोरगाव, रावगाव, वडगाव, पूनवर, हिवरवाडी, भोसे यासह परिसरातील १५ ते २० गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.
मांगी तलाव भरल्याने लाभ क्षेत्रातील गावांना या पाण्यावर रब्बीसह उन्हाळा हंगामातील पिके घेता येणार आहेत. त्यामुळे रब्बी हंगामाला तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन होणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मांगीच्या डाव्या व उजव्या कालव्याचे दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर…
यांत्रिकी विभागाकडून करमाळा पाटबंधारे विभागाला मशिनरी उपलब्ध झाल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून मांगी तलावाच्या उजवा आणि डावा या दोन्ही कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मांगी तलावाच्या लाभक्षेत्रातील गावांच्या मागणीनुसार या दोन्ही कालव्याला पाणी देण्याचे नियोजन आखलेले आहे.
- संजय अवताडे, उपअभियंता, कुकडी डावा कालवा उपविभाग क्र. 12.